नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आता एक चांगला आणि तितकाच भक्कम आधार मिळण्याची चिन्हं आहेत. ज्यामुळे देशाची आर्थिक अडचण दूर होण्याची दाट शक्यता आहे. खुद्द पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या इम्रान खान यांनीच याविषयीची माहिती दिली. पाकिस्तानच्या काही भागातील भूगर्भात नैसर्गिक तेल आणि वायूचे साठे मिळण्याचे संकेत देण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय विश्वात सध्या याविषयीच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरला आहे. येत्या तीन आठवड्यांमध्ये आनंदाची बातमी मिळणार असल्याची आशा पाकिस्तानकडून व्यक्त करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'The Exxon' या कंपनीकडून पाकिस्तानच्या सागरी सीमेत येणाऱ्या भागात या साठ्यांचा शोध घेण्याचं काम वेगाने सुरु आहे. काही तज्ज्ञांच्या निरिक्षणानुसार पाकिस्तानमध्ये नैसर्गिकत तेल आणि वायूचे साठे सापडण्याची दाट शक्यता असून, याचा वापर फक्त पाकिस्तानलाच होणार नसून निर्यात व्यापाराच्या दृष्टीनेही देशाला मोठा फायदा होणार आहे', असं इम्रान खान म्हणाले. यापुढे पाकिस्तान सरकारकडून नैसर्गिक वायूची विक्री ही अनुदानित रकमेवर होणार नसल्याचंही खान यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर पडलेला बोजा बऱ्याच अंशी कमी होणार असून, देश एका वेगळ्या मार्गावर जाण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. 


पाकिस्तानच्या दृष्टीने सकारात्मक अशी बातमी देत पाकिस्तामनध्ये गतकाळात होऊन गेलेल्या सरकारवरही त्यांनी टीका केली. देशाच्या मागील सरकारकडून काही संपत्ती ठेवण्यात आली आहे का, असा बोचरा प्रश्न उपस्थित करत त्यांनी डबघाईला गेलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेकडे सर्वाचं लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी भारतासोबतच्या नात्यावर या घटनेने काही फरक पडेल का, या प्रश्नाचं उत्तरही दिलं. 


आगामी निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा जिंकले तर ही तणावाची परिस्थिती काही प्रमाणात निवळण्याची शक्यता खान यांनी वर्तवली. तर, निवडणुकांमध्ये पराजयाची भीती भाजपला भेडसावत असेल तर मात्र त्यांच्याकडून  दुस्साहस केलं जाण्याची बाब नाकारता येत नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.