Pakistan Includes Terrorist Wife In Cabinet: पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवर-उल-हक काकड यांनी श्रीनगरमधील फुटीरतावादी नेता दहशतवादी यासीन मलिकच्या पत्नीवर महत्त्वची जबाबदारी सोपवली आहे. यासीन मलिकची पत्नी मशआल मलिकला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. 'डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या 18 सदस्यीय मंत्रीमंडळामध्ये मशआल मलिकचा मानवाधिकार प्रकरणांसदर्भात पंतप्रधानांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. 


कोण आहे ही महिला आणि यासिन कधी भेटला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मशआल मलिकने 22 फेब्रुवारी 2009 रोजी रावळपिंडीमध्ये मशआलने यासीन मलिकबरोबर निकाह केला होता. विकिपीडियावरील माहितीनुसार, 2005 साली यासीन मलिक पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा त्याची आणि मशआलची पहिल्यांदा भेट झाली होती. मशआलने लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. मशआल मलिकच्या नेमणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याची चर्चाही पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.


मशआलचे आई वडील नावाजलेलं दांपत्य


मशआल मलिकची आई रेहाना हुसैन मलिक ही पीएमएल-एनच्या महिला विंगच्या महासचिव पदी कार्यरत होती. तर मशआलचे वडील एम. ए. हुसैन मलिक अंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले अर्थतज्ज्ञ आहेत. एम. ए. हुसैन मलिक हे जो बॉन विश्वविद्यालयामधील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते. तसेच नोबेल पुरस्कार ज्यूरीमधील पहिले पाकिस्तानी सदस्य म्हणूनही एम. ए. हुसैन मलिक यांना ओळखलं जातं.


मुलीबरोबर इस्लामाबादमध्ये राहते


यासीन मलिकची पत्नी मशआल मलिकचा भाऊ हैदर अली हुसैन वॉशिंग्टन डी. सी. मधील नेव्हल ग्रॅज्युएल स्कूलमध्ये लेक्चरर म्हणून काम करतो. यासीनची बहीण साबिएन हुसैन मलिक एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मशआल इस्लामाबादमध्ये 12 वर्षीय मुलगी रझिया सुल्तानाबरोबर राहते.


यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा


मशआल मलिकचा पती यासीन मलिक हा फुटीरतावादी नेता आहे. मलिकला राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने दहशतवादी कृत्यांसाठी आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली 2019 च्या सुरुवातीला अटक केली होती. मागील वर्षी मे महिन्यामध्ये दिल्लीतील न्यायालयाने यासीन मलिकला दहशतवादी कृत्यांसाठी आर्थिक मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवलं. यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.



हंगमी पंतप्रधान कधीपर्यंत?


अनवर-उल-हक काकड यांना पाकिस्तानमधील आगामी सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. अनवर-उल-हक काकड यांची नियुक्ती 12 ऑगस्ट रोजी करण्यात आली. अनवर-उल-हक काकड हे बलूचिस्तानमधील पश्तून आहेत. ते बलूचिस्तान अवामी पार्टीचे (बीएपीचे) सदस्य आहेत. पाकिस्तानमध्ये आगामी काही महिन्यांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय संसदेचा कार्यकाळ 12 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे.