नवी दिल्ली : तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर भारतात राहणारे अफगाणी नागरिक त्यांच्या कुटुंबीयांबद्दल चिंतित आहेत. अफगाणी नागरिक जगभरातून मदतीच्या आशेवर आहेत. विशेषतः या नागरिकांना भारताकडून मोठ्या आशा आहेत. भारतात गेली अनेक वर्ष  वास्तव्यास असणारे अफगाण वंशाचे व्यापारी झहीर खान यांनी हे मत व्यक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान (Pakistan), चीन (China) आणि सौदी अरेबियावर (Saudi Arabia) आमचा जराही विश्वास नाही, भारतावर आमचा प्रचंड विश्वास आहे आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून आम्हाला मोठ्या आशा आहेत, असं झहीर खान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला मदत करू शकतात, असं झहीर खान यांचं म्हणणं आहे.


कोलकाताच्या मलिक बाजार इथं झहीर खान व्यवसाय करतात. अफगाणिस्तानची सद्य परिस्थिती पाहून ते खूप दुःखी आहे. अशा अफगाणिस्तानला कधीही स्वीकारणार नाही, जिथे तालिबानचे राज्य आहे असं झहीर खान सांगतात. झहीर खान यांचे वडील सुमारे 25 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातून भारतात आले होते आणि तेव्हापासून ते कोलकाता इथं राहत आहेत. कोलकातामध्ये अनेक अफगाणींची घरं आहेत.


त्यांना इथं 'काबुलीवाला' अर्थात Men of Kabul म्हणून ओळखलं जातं. हे अफगान नागरिक 1840 च्या आसपास इथं आले होते आणि तेव्हापासून ते कोलकातामध्ये राहत आहेत. चीन आणि पाकिस्तानने तालिबानला पाठिंबा दिला आहे असं झहीर खान यांचं म्हणणं असून अफगाणिस्तानचे लोक फक्त भारतावर विश्वास ठेवतात असंही झहीर खान यांनी म्हटलं आहे.


मलिक बाजारमधील आणखी एक व्यापारी इब्राहिम खान म्हणतात 'तुम्ही पाकिस्तानबद्दल कोणत्याही अफगाणिणीचे मत विचारता, ते म्हणतील की त्यांना त्या देशाकडून कोणतीही मदत नको आहे. पाकिस्तान आमचे पहिले शत्रू आहेत. 


इब्राहिम यांचं कुटुंब अफगाणिस्तानमध्ये राहतं. पंतप्रधान मोदींनी आमच्या कुटुंबांना तेथून बाहेर काढण्यासाठी आम्हाला मदत करावी. असं आवाहन इब्राहिम खान यांनी केलं आहे.