पाकने दहशतवादी गटांवर कारवाई न केल्याने बालाकोट हल्ला : भारत
पाकिस्तानी भूमीवर सुरू असलेल्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्याची भारताची मागणी वारंवार दुर्लक्षित केली जात होती. त्यामुळे भारताला अखेर कारवाई करावी लागली.
नवी दिल्ली : पाकिस्तानशी वाढलेला तणाव आणखी वाढणार नाही, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे. पाकिस्तानी भूमीवर सुरू असलेल्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्याची भारताची मागणी वारंवार दुर्लक्षित केली जात होती. त्यामुळे भारताला अखेर कारवाई करावी लागली, अशी भूमिका परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मांडली. चीनमध्ये भारत, रशिया, चीन यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत स्वराज यांनी भारताची भूमिका अत्यंत योग्य शब्दात स्पष्ट केली.
भारताच्या हवाई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी आणि चीनने भारताला आणि पाकिस्तानला संयमाचा इशारा दिला असला अमेरिकेने मात्र पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत. अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी अड्ड्यांवर तातडीने कारवाई कऱण्याची तंबी पुन्हा एकदा दिलीय. अमेरिकन लष्कराच्या तीनही दलांचे प्रमुख जनरल जोसेफ डनफर्ड य़ांनी पाकिस्तानी लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल झुबेर मोहम्मद हयात यांच्याशी भारताच्या हवाई हल्ल्यानंतर फोनवरून संपर्क साधला.
दरम्यान, पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर हवाई हल्ला चढवला होता. या हल्ल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने आज भारतावर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने हा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईत पाकिस्तानचे एक विमान पाडले गेले तर भारतालाही एक विमान गमवावे लागले. पाकिस्तानच्या हद्दीत पडलेल्या या भारतीय विमानाच्या पायलटला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याने स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय पायलटला सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारताने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.