निवडणूक : बहुमत नसल्याने पाकिस्तानात त्रिशंकू स्थिती, सरकार बनविण्यासाठी आघाडी
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने सर्वाधिक १०९ जागा जिंकल्या आहेत.
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने सर्वाधिक १०९ जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तानी निवडणूक आयोगानं ही माहिती दिली आहे.दरम्यान, २० जागांचे अधिकृतपणे निकाल घोषित करण्यात आलेले नाहीत. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे या २० जागांच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
सार्वत्रिक निवडणुकीतल्या २७० पैकी २५० जागांचे निकाल निवडणूक आयोगानं जाहीर केले आहेत. यामध्ये नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ पक्षाने ६२ जागा जिंकल्यात. तर पाकिस्तान पिपल्स पार्टीनं ४२ जागा जिंकल्या आहेत. तर १२ अपक्षही या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
पाकिस्तानात बुधवारी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या. मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं, सरकार स्थापन करण्यासाठी आघाडीची गरज लागणार आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाला सरकार बनविण्याची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.