Imran Khan Arrest: इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, पोलीस घरी दाखल
Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक केलं जाण्याची शक्यता आहे. तोशखाना (Toshkhana) प्रकरणी अटक करण्यासाठी पोलीस इम्रान खान यांच्या घऱी दाखल झाले आहे. दरम्यान पीटीआय पक्षाचे माजी नेते फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी इम्रान खान यांना अटक केल्यास स्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा दिला आहे.
Imran Khan Arrest: पाकिस्तानात (Pakistan) सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरु आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना कोणत्याही क्षणी अटक (Arrest) केली जाण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. पोलीस इम्रान खान यांच्या घरी दाखल झाल्याची माहिती मिळताच पीटीआय (PTI) पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांना घराबाहेर जमण्यास सुरुवात केली आहे. पोलीस तोशखाना (Toshkhana) प्रकरणी ही अटकेची कारवाई करत आहेत.
पाकिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस इम्रान खान यांच्या जमन पार्क (Zaman Park) येथील घरी दाखल झाले आहेत. दरम्यान, इम्रान खान यांच्या अटकेची तयारी सुरु असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून समर्थक आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानचे माजी मंत्री आणि नेते फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी सरकारला जाहीर इशारा दिला आहे. जर इम्रान खान यांनी अटक करण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल असं विधान त्यांनी केलं आहे. देशविरोधी सरकारने देशाला अजून संकटात न टाकता योग्य निर्णय घ्यावा असं फवाद चौधरी म्हणाले आहेत.
पोलीस अटक वॉरंट घेऊन दाखल
इम्रान खान यांच्याविरोधात इस्लामाबाद सत्र न्यायालयाने २८ फेब्रुवारीला अजामीनपात्र अकट वॉरंट जारी केलं होतं. तोशखाना प्रकरणी हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या अटकेची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस आज इम्रान खान यांना फक्त नोटीस देण्यासाठी गेली आहे. अटकेची कारवाई नंतरही केली जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे इम्रान खान यांच्या घऱाबाहेर मोठ्या प्रमाणात जमलेले समर्थक आणि कार्यकर्ते गोंधळ घालत आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर इम्रान खान यांना अटक केलं जाण्याची शक्यता आहे.
इम्रान खान यांच्याविरोधात वेगवेगळ्या प्रकरणी कोर्टांमध्ये सुनावणी सुरु आहेत. यामध्ये तोशखाना, दहशतवाद, हत्येचा प्रयत्न, प्रतिबंधित संस्थांकडून निधी मिळवणे अशा प्रकरणांचा समावेश आहे. इस्लामाबाद कोर्टाने इम्रान खान यांनी इतर तीन प्रकरणी जामीन मंजूर केला होता. पण तोशखाना प्रकरणी अटक वॉरंट जारी केला. इम्रान खान यांच्या वकिलाने कोर्टात अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली असता ती कोर्टाने फेटाळून लावली होती.
तोशखाना प्रकरण नेमकं काय आहे?
पाकिस्तान सरकारमध्ये तोशखाना हे एका शासकीय विभागाचं नाव आहे. एखादी व्यक्ती पदावर असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तू या विभागात जमा कराव्या लागतात. इम्रान खान यांनाही पंतप्रधान असताना अनेक मौल्यवान गोष्टी भेटवस्तू म्हणून मिळालेल्या होत्या. पण त्यांनी त्या तोशखानात जमा न करता त्या विकून पैसे मिळवल्याचा आरोप आहे.