पाकिस्तानने सोपवली कैद असलेल्या भारतीय कैद्यांची यादी
पाहा किती भारतीय पाकिस्तानच्या जेलमध्य़े आहेत कैद
नवी दिल्ली : पाकिस्तानने रविवारी भारतीय उच्च आयोगाला पाकिस्तानातील कारागृहांमध्ये बंद असलेल्या कैद्यांची संख्या सांगितली आहे. 471 भारतीय कैद्यांची यादी पाकिस्तानने भारताकडे सोपवली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितलं की, ही यादी 21 मे 2008 ला पाकिस्तान आणि भारत यांच्यात झालेल्या कॉन्सुलर एक्सेस करारानुसार दिली आहे. एकूण 471 भारतीय कैदी ज्यामध्ये 418 मच्छिमार आणि इतर 53 कैद्यांचा समावेश आहे.
या कैद्यांना पाकिस्तानच्या जल सीमा भागात बेकायदेशीरपणे घुसल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलं होतं. दोन्ही देशांमध्ये 21 मे 2008 मध्ये भारत आणि पाकिस्तानला वर्षातून 2 वेळा 1 जानेवारी आणि 1 जुलैला आपल्या देशामध्ये कैद असलेल्या कैद्यांची नावे द्यावी लागतात.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पठानकोट एयरबेस आणि उरी हल्ल्यानंतर बिघडले होते. त्यांनतर भारतीय जवानांनी पाक अधिकृत काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने असं काही झाल्याचं नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भारतीय नेव्हीचा माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अटकेनंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा तणावाचे संबंध होते. पाकिस्तानने त्यांच्यावर गुप्तहेर असल्याचा आरोप लावत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. भारताने ही गोष्ट फेटाळत आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आणि फाशीच्या निर्णयावर स्थगिती आणली होती.