टेररिस्तान आहे पाकिस्तान, आम्हाला शिकवू नका! भारताचा पलटवार
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेत काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका केली होती. त्याना आता भारताने पलटवार दिला आहे.
जिनिव्हा : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेत काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका केली होती. त्यांच्यावर आता भारताने पलटवार केला आहे.
संयुक्त राष्ट्रात भारताच्या फर्स्ट सचिव एनएम गंभीर म्हणाल्या की, ‘टेररिस्ट आहे पाकिस्तान’.
त्या म्हणाल्या की, ज्या देशाच्या नावाचा अर्थ पवित्र भूमी असा होतो, तो देश आज दहशतवाद्यांची भूमी बनला आहे. ज्यांची अवस्था आधीच वाईट आहे, त्यांनी जगाला मानवाधिकार आणि लोकशाहीचे धडे शिकवू नयेत. पाकिस्तानात दहशतवादी खुलेआम फिरतात. हा तोच देश आहे ज्यांनी ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमर याला शरण दिली होती. आज ते स्वत:ला पिडीत म्हणवून घेत आहेत.
आतापर्यंतच्या इतिहासाने हे स्पष्ट झालंय की, पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकाराच्या ज्ञानाची जगाला गरज नाहीये. ते त्यांच्याच जमिनीवर मानवाधिकारांची पायमल्ली करतात. भारताचा हा शेजारी देश दहशतवादाला जन्म देतोय आणि जागतिक स्तरावर तो पसरवत आहे.