पाकिस्तानातल्या `निर्भया`साठी जनता रस्त्यावर, दोघांचा मृत्यू
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांविरुद्ध हिंसक आंदोलन केलं. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झालाय.
कराची : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांविरुद्ध हिंसक आंदोलन केलं. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झालाय.
बलात्कार आणि हत्या
सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्यानं हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात चिमुरडीचं अपहरण कासुर जिल्ह्यातील तिच्या राहत्या घरासमोरून करण्यात आलं होतं. मंगळवारी तिचं शव कचऱ्याच्या ढिगात आढळलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत मुलीचं शव शवविच्छेदनासाठी धाडलं. शवविच्छेदनात बलात्कारानंतर गळा दाबून या चिमुरडीची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं. संबंधित चिमुरडी आई-वडील तीर्थयात्रेसाठी गेले असताना ती आपल्या नातेवाईकांसोबत राहत होती. पोलिसांनी या घटनेत चार संशयितांना ताब्यात घेतलंय.
पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह?
मुलीला सोबत घेऊन जाताना एक व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या व्यक्तीची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, या घटना सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहचल्यानंतर लोकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन सुरू केलं. आंदोलनकर्त्यांनी कासुर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनवर दगडांचा वर्षावही केला. यामुळे पूर्ण शहर एक दिवस बंद राहीलं.
आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. याच दरम्यान गोळी लागल्यानं जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झालाय.
या बलात्कार आणि हत्या प्रकरणानं संपूर्ण पाकिस्तानातील सामान्य जनता रस्त्यावर उतरलेली दिसतेय. पाकिस्तानातील सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनीही या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केलीय.