इस्लामाबाद : Pakistan Political Crisis : पाकिस्तानातील इम्रान खान (Imran Khan) सरकारने अखेरच्या घटका मोजायला सुरूवात केली आहे. विरोधी पक्षांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यातच खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाच्या 24 खासदारांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. हे खासदार इस्लामाबादच्या सिंध हाऊसमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. या बंडखोरीमुळे खान सरकार संकटात सापडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

342 क्षमतेच्या पाकिस्तानी लोकसभेमध्ये 172 हा जादुई आकडा आहे. खान यांच्या PTIचे 155 खासदार आहेत. त्यांना सरकारस्थापनेवेळी 6 छोट्या पक्षांच्या 23 सदस्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र आता 5 खासदार असलेला PMLQ, 7 खासदार असलेल्या MQMContent आणि 5 खासदार असलेल्या बलुचिस्तान आवामी पार्टी यांनीआपले पत्ते उघड केलेले नाहीत. हे पक्ष दोन्ही दगडांवर पाय ठेवून चांगल्या 'डील'च्या शोधात असल्याची चर्चा आहेत. त्यातच आता खुद्द इम्रान खान यांचे 24 मोहरे विरोधकांच्या गळाला लागल्याचं दिसत आहे. 


एकीकडे इस्लामाबादमध्ये घोडाबाजार तेजीत आला असताना सर्वशक्तिमान पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीही खान यांच्या डोक्यावरचा हात काढलाय. या राजकीय साठमारीमध्ये लष्कर तटस्थ राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे खान यांच्या बुडत्या सरकारचा भक्कम आधारही हरपला आहे.


विरोधी पक्षांची एकी, मित्रपक्षांनी सोडलेली साथ आणि स्वपक्षीयांचं बंड यामुळे इम्रान खान यांचा तोल ढळलाय. 28 मार्चला अविश्वास प्रस्तावावर मतदान असताना त्याच्या एक दिवस आधी इस्लामाबादच्या डेमोक्रेसी चौकात 10 लाखाचा मोर्चा काढण्याची घोषणा खान यांनी केलीये. मात्र सरकार वाचवण्यासाठी मोर्चा नव्हे, तर संसदेतील बहुमत उपयोगी पडणार आहे आणि सध्या ते खान यांच्याकडे आहे, असं दिसत नाही. खान सरकारचा अंत जवळपास निश्चित असला तरी त्यानंतर सत्तेची साठमारी सुरू होऊन पाकिस्तानात पुन्हा अराजक माजण्याची शक्यता आहे.