इस्लामाबाद : पाकिस्तानचे पुढील संभाव्य पंतप्रधान इम्रान खान यांनी निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरुपात माफी मागितली आणि प्रतिज्ञापत्र सादर केलेय. त्यांच्या या क्षमायाचनानंतर निवडणूक आयोगाने पाठवलेली नोटीस मागे घेतली आहे. त्यामुळे आता माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा झालाय. पाकिस्तानातील निवडणूक आयोगाने तहरीक-ए-इंसाफ प्रमुख इम्रान खान यांचा माफिनामा एक विरुद्ध तीन मतांनी मंजूर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदावर टांगती तलवार असली तर पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांना माफी मागावी लागणार आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाने (ईसीपी) भडकवणारे भाषण देणे आणि निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर लगावला होता. त्यानंतर त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. या प्रकरणी लिखित मागी मागावी असा आदेश दिला होता.


निवडणूक आयोगाने इम्रान खान याचे वकील बाबर अवान यांना सांगितले की, इम्रान खान यांनी शुक्रवारपर्यंत माफिनामा दाखल करावा. या माफिनाम्यावर इम्रान खान यांचे हस्ताक्षर असावे असेही सांगितले होते. इम्रान खान यांच्यावर निवडणूक प्रचारावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात अर्वाच्च भाषेचा वापर करणे, भडकवणारे भाषण देणे आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे दोन प्रकरणं न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी माफी मागितली नसती तर त्यांच्या पंतप्रधान शपथविधीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र, लेखी स्वत: माफी मागितल्याने हा पेच आता सुटलाय.