मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारतासोबत शांततेबाबत वक्तव्य केले आहे. दोन्ही देशांसाठी युद्ध हा पर्याय नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. आम्हाला भारतासोबत 'शाश्वत शांतता' हवी आहे आणि त्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. (Pak PM Shehbaz Sharif talks of permanent peace with India)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युद्ध हा कोणत्याही देशासाठी उपाय नाही. मात्र शांतता हा जम्मू-काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने संबंधित आहे, असे ही ते म्हणाले. हार्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.


PM शाहबाज शरीफ म्हणाले की, 'पाकिस्तान शांततेच्या बाजूने आहे आणि प्रादेशिक शांतता ही संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार जम्मू-काश्मीरच्या समस्येच्या निराकरणावर अवलंबून आहे. आम्हाला भारतासोबत शाश्वत शांतता हवी आहे आणि संवाद हाच एकमेव मार्ग आहे. युद्ध हा कोणत्याही देशासाठी पर्याय नाही.'


शाहबाज शरीफ म्हणाले की, इस्लामाबाद आणि नवी दिल्ली यांनी व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेत समानता आणली पाहिजे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी देशाची आर्थिक स्थिती आणि देशातील अस्थिरतेबद्दलही उत्तर दिले. ते म्हणाले की, पाकिस्तानातील आर्थिक संकट हे संरचनात्मक समस्या आणि दशकांच्या राजकीय अस्थिरतेमुळे आहे. पाकिस्तानच्या जन्मानंतरच्या पहिल्या काही दशकांमध्ये अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रभावी वाढ झाली, जेव्हा योजना, राष्ट्रीय इच्छाशक्ती आणि अंमलबजावणीची यंत्रणा होती.


पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा पुढील महिन्यात समरकंद येथे होणाऱ्या SCO शिखर परिषदेत दोन्ही देशांचे पंतप्रधान भेटण्याची शक्यता आहे. 15-16 सप्टेंबर रोजी समरकंद, उझबेकिस्तान येथे होणाऱ्या शिखर परिषदेच्या अगोदर, दोन्ही देशांचे पंतप्रधान द्विपक्षीय बैठक देखील घेऊ शकतात असे वृत्त आहे. 


गेल्या सहा वर्षांपासून दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये एकही बैठक झालेली नाही आणि दोन्ही देशांमध्ये संवादही झालेला नाही. अशा परिस्थितीत समरकंदमध्ये दोन्ही देशांचे नेते भेटले तर भारत-पाकिस्तान परस्पर संबंध सुधारण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतात, असे मानले जात आहे.