Pakistan Political Crisis : पाकिस्तानमध्ये ( Pakistan) मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ सुरु आहे. 3 एप्रिल तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसं इम्रान खान सरकारच्या अडचणीत वाढ होत आहे. अशा स्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही (Pakistan PM Imran Khan) सत्ता वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्राम खान यांनी आज जनतेला संबोधित केलं. आपल्या भाषणात त्यांनी म्हटलं 'मी भाग्यवान आहे की देवाने मला सर्व काही दिले आहे. प्रसिद्धी, संपत्ती, सर्वकाही. मला आज कशाचीही गरज नाही, माझ्याकडे सर्व काही आहे ज्यासाठी मी खूप आभारी आहे. पाकिस्तान माझ्यापेक्षा फक्त 5 वर्षांनी मोठा आहे, मी देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या पिढीतील आहे, असं सांगत त्यांनी पाकिस्तानी जनतेला भावनिक साद घातली.


खुर्ची धोक्यात आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. भारतासोबत शत्रुत्व नाही, मात्र काश्मीरवरून मतभेद असल्याचं सांगत नवाज शरीफ आणि मोदींच्या भेटीकडेही त्यांनी बोट दाखवलं. रविवारी अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार असून त्यावेळी पाकिस्तान स्वतंत्र राहणार की गुलाम होणार याचा फैसला होईल असं इम्रान खान म्हणाले.


अमेरिकेच्या धोरणांवर टीका
इम्रान खान म्हणाले की, आम्ही अमेरिकेला नेहमीच पाठिंबा दिला. मात्र त्यांनी पाकिस्तानवर निर्बंध लादले. अमेरिकेत 9/11 च्या हल्ल्यात एकही पाकिस्तानी नव्हता. अमेरिकेची वकिली करणं ही मुशर्रफ यांची मोठी चूक असल्याचं इम्रान खान म्हणाले. पाकिस्तानने अमेरिकेशी युद्ध केलं आणि केवळ निर्बंध लादले. मी भारत किंवा इतर कोणत्याही देशाचा विरोध करत नाही. 


इम्रान खान पुढे म्हणाले मी लहान असताना मला आठवतंय, पाकिस्तान सर्वचबाबतीत अव्वल होता. पाकिस्तानची प्रगती पाहण्यासाठी दक्षिण कोरियाचं शिष्ठमंडळ पाकिस्तानमध्ये आलं होतं. मलेशियाचा राजकुमार माझ्यासोबत शाळेत शिकत होता. मध्यपूर्वेतील देश आमच्या विद्यापीठांत यायचे. पण दुर्देवाने मी सर्व बुडताना पाहिलं आहे, माझ्या देशाचा अपमान होताना मी पाहिला आहे. 


3 एप्रिलला इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे.