ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युद्ध होईल, पाकिस्तानी नेत्याचे भडकाऊ भाषण (व्हिडीओ)
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्रिमंडळ भडकाऊ वक्तव्य करत आहेत.
इस्लामाबाद : काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्रिमंडळ भडकाऊ वक्तव्य करत आहेत. यामध्ये आता आणखी एका भाषणाची भर पडली आहे. पाकिस्तानी नेत्याच्या वादग्रस्त भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होताना मी पाहतोय असे वक्तव्य इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या रेल्वे मंत्री शेख राशिद खान यांनी केले आहे. रावळपिंडीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
ऑक्टोबरच्या शेवटी आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल. यासाठी जनतेला सज्ज करण्यासाठी निघालो आहे. युद्ध होईलच असे नाही पण मोदीला समजण्यासाठी मोठ्या सत्ताधाऱ्यांनी जी चूक केली ती मी करु इच्छित नाही असे ते म्हणाले.
२४ ते २५ कोटी मुस्लिम पाकिस्तानकडे पाहत आहेत. आज आपल्याला आपल्यातले असंख्य मतभेद विसरुन काश्मीरचा आवाज बनत एकसाथ राहायचे आहे. सैन्याच्या खांद्याला खांदा लावावा लागेल नाहीत वर्तमान आपल्याला कदापि माफ करणार नसल्याचे भडकाऊ भाषण त्यांनी केले.