पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं चोख उत्तर
दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी म्हणून पाककडून अनेकदा गोळीबार केला जातो.
श्रीनगर : संपूर्ण जग कोरोनाचा सामना करतोय. कोरोनापासून आपल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वच देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतासह जगातील सर्व देश यामध्ये गुंतले आहेत. पण अशा कठीण परिस्थितीतही, शेजारील देश आणि दहशतवाद्यांचा कारखाना असलेला पाकिस्तान मात्र नापाक हरकती करण्यात व्यस्त आहे.
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील (एलओसी) शस्त्रसंधीचे पाकिस्तानने पुन्हा उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधींचं उल्लंघन करत पाकिस्तानच्या सैन्याने राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.
सुंदरबनी सेक्टरमध्ये सायंकाळी 5.15 वाजता पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी सैनिकांकडून झालेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले.
विशेष म्हणजे अलिकडच्या काळात पाकिस्तानकडून शस्त्रसंधींच्या उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामागे दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी मदत करणे हेच मुख्य कारण मानले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरूद्ध मोहीम सुरू केली आहे. दररोज काही दिवस या केंद्रशासित प्रदेशातून काही ठिकाणी चकमकीच्या बातम्या येत असतात. सुरक्षा दलाचे जवान दररोज दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांना ठार करत आहेत.