भारतीय दुतावासात इफ्तार पार्टीला गेलेल्या पाहुण्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी धमकावले
पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून पाहुण्यांना धमकावून परत पाठवण्यात आले.
इस्लामाबाद: पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीच्यावेळी एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी याठिकाणी आलेल्या पाहुण्यांना आणि भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकावून परत पाठवले.
या प्रकारामुळे द्विपक्षीय संबंध आणखीनच बिघडण्याची भीती पाकिस्तानमधील भारताचे राजदूत अजय बिसरिया यांनी व्यक्त केली. त्यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेला या संपूर्ण प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यांनी म्हटले की, शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीच्यावेळी पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून पाहुण्यांना धमकावून परत पाठवण्यात आले. त्याबद्दल आम्ही सर्वांची माफी मागतो. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या या वागण्याने आम्ही खूपच निराश झालो आहोत, असे बिसरिया यांनी म्हटले.
पाकिस्तानची ही कृती केवळ राजनैतिक आणि नागरी शिष्टाचारांचा भंग नाही, तर यामुळे द्विपक्षीय संबंधांनाही बाधा पोहोचेल, असे बिसरिया यांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, या इफ्तार पार्टीला अनेक पाहुणे उपस्थित होते. या सगळ्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून त्रास देण्यात आला, तसेच धमकावण्यातही आले. तर काही जणांच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज पाठवण्यात आले होते.
हॉटेल सेरेना येथे भारतीय दुतावासाने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी शेकडो लोकांना निमंत्रणही दिले होते. मात्र, पाकिस्तानी यंत्रणांकडून त्यांच्या फोनवर मास्क्ड म्हणजेच नंबर न दिसणाऱ्या प्रणालीवरून फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तसेच माघारी जाण्यास किंवा इफ्तार पार्टीमध्ये सहभागी न होण्याविषयी धमकावले होते. यामुळे अनेक पाहुणे हॉटेलच्या दारातून माघारी फिरले होते.