लखनऊ: पाकिस्तानमधील डॉन Dawn या प्रसिद्ध दैनिकाचे संपादक फहद हुसैन यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. ते डॉनच्या इस्लामाबाद आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. या ट्विटमध्ये फहद हुसैन यांनी पाकिस्तानतील इम्रान खान यांच्या सरकारपेक्षा योगी सरकारचे काम उजवे असल्याचे म्हटले आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश सरकारने अत्यंत कठोरपणे लॉकडाऊन राबवला. पाकिस्तानात इम्रान खान सरकारला हे जमले नाही. उत्तर प्रदेशच्या तुलनेत पाकिस्तानातील लोकसंख्येची घनता कमी आहे. तसेच पाकिस्तानातील लोकांचे दरडोई उत्पन्नही जास्त आहे. तरीदेखील उत्तर प्रदेशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यात बऱ्याच अंशी यश आले. तसेच पाकिस्तानातील मृत्यूदरही उत्तर प्रदेशपेक्षा जास्त असल्याचे फहद हुसैन यांनी म्हटले आहे. 

फहद हुसैन यांनी महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावासंदर्भातही भाष्य केले आहे. उत्तर प्रदेशच्या तुलनेत पाकिस्तानात कोरोनामुळे जास्त मृत्यू झाले आहेत. मात्र, महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न जास्त असूनही मृत्यूदर पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशने कोणते योग्य निर्णय घेतले किंवा महाराष्ट्र कुठे चुकला, हे आपल्याला ध्यानात घेतले पाहिजे. पाकिस्तानची लोकसंख्या २०.८० कोटी आहे. तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या २३.१५ कोटी आहे. तरीही योगी सरकारने पाकिस्तानच्या तुलनेत कोरोनावर चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळवल्याचे फहद हुसेन यांनी सांगितले. 



उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानच्या लोकसंख्येत फार फरक नाही. उत्तर प्रदेशात आतापर्यंत १०५३६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पाकिस्तानात ९८,९४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय, पाकिस्तानातील २००२ लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेशात मृतांची संख्या केवळ २७५ इतकी आहे.