इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या जनतेला भडकवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हिंदू वर्चस्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात इम्रान खान यांनी ट्विटरवरून गरळ ओकली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्करी ताकदीचा वापर करून दहशतवाद्यांना हरवणे शक्य आहे मात्र, जेव्हा एखाद्या धर्माचे नागरिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्यांच्याविरुद्ध लढणे इतके सोप नसते असं ट्विट इम्रान खान यांनी केले आहे. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यापासून त्यांना कोणीच रोखू शकत नाही असंही इम्रान यांनी ट्विट केले आहे.




दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात पाकिस्तानकडून कुरघोडी सुरुच आहे. आज शनिवारी पाकिस्तानकडून नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला. लान्स नाईक संदीप थापा असे जवानाचे नाव आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून येथे गोळीबार सुरु आहे. भारताकडूनही गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात येत आहे.



 चीन सुरक्षा परिषदेत तोंडघशी


काश्मीर प्रश्नावरून संयुक्त राष्ट्रांमध्ये अनौपचारिक चर्चेमध्ये भारताला बदनाम करण्याचा पाकिस्तान आणि चीनचा डाव निष्फळ ठरला. काश्मीरमधील परिस्थिती अतिशय धोकादायक असल्याची कागाळी शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंद दरवाजा बैठकीत केली. मात्र त्या प्रश्नात लक्ष घालण्याचा अधिकारच संयुक्त राष्ट्रांना नसल्याचे सांगून रशियाने चीन आणि पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावलेत. त्यामुळे चीन सुरक्षा परिषदेत तोंडघशी पडलाय. त्यानंतर काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न असून त्यात अन्य देशांनी पडण्याचे कारण नाही, अशा शब्दांत भारताने बाजू मांडली.


भारत व पाकिस्तान यांनी परस्पर चर्चा करून त्यांच्यातील प्रश्न सोडवावा, संयुक्त राष्ट्रांनी त्यात पडण्याचे कारण नाही, असे सांगून रशियाच्या प्रतिनिधीने थेट भारताची बाजूच लावून धरली. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनेही तीच भूमिका मांडली. या बैठकीत पाकिस्तान व भारत यांना बोलावण्यात आले नव्हते. दहशतवाद थांबवला तरच चर्चा शक्य आहे, असे भारताने पाकिस्तानला ठणकावले.