नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीजफायर अर्थात शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं तूर्तास भारत-पाकिस्तान सीमेवर शांतता दिसत असली तरी पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी अजून संपलेली नाही. भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या शांतता दिसते आहे. पण प्रत्यक्षात पाकिस्तान युद्धाच्या तयारीत गुंतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. पाकिस्तान सध्या विदेशातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि युद्धसामुग्रीची खरेदी करतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्नायपर रायफली, रडार, मिनी यूएव्ही, रणगाडे आदी शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. आपल्या मुख्य छावण्यांपर्यंत दारुगोळा आणि सैनिकी सामान पोहोचवण्याच्या हालचाली सध्या सीमेपलीकडं पाकिस्तानात सुरू आहेत. दिवस-रात्र युद्ध लढण्यासाठी सैनिकांना सक्षम करण्याच्या दृष्टीनं पाकिस्तानी कारवाया सुरू आहेत.


गेल्या 15 जानेवारीला भारतानं मिनी ड्रोनच्या मदतीनं मोठ्या भूभागावर हल्ला करण्याचं आपले कौशल्य दाखवून दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं तुर्कस्थानकडून मोठ्या प्रमाणात एस 250 ड्रोन खरेदी सुरू केली आहे. पाकव्याप्त काश्मिरात तैनात पाकिस्तानी सैनिक सध्या या ड्रोन वापराचं प्रशिक्षण घेत आहेत.



त्याशिवाय पाकिस्ताननं टी 80 रणगाड्यांसाठी थर्मल इमेजिंग साईट खरेदी सुरू केली आहे. रात्रीच्या वेळी देखील रणगाड्यांचा वापर करता यावा, यादृष्टीनं पाकच्या या हालचाली सुरू आहेत. पाकिस्ताननं यूक्रेनकडून ३२० नवे रणगाडे खरेदी केलेत. जगातील सर्वोत्तम रणगाड्यांमध्ये या टी 80 रणगाड्यांचा समावेश आहे. त्याशिवाय पाकिस्तानी सैनिकांसाठी एका आफ्रिकी कंपनीकडून 12.7 मिमी कॅलीबरच्या स्नायपर रायफल्स खरेदी करण्यात आल्यात. 


बालाकोटमध्ये भारतीय वायुदलानं पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केलं होतं. त्यानंतर पाकिस्ताननं आपलं वायूदल सक्षम करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलंत. त्यादृष्टीनं चीनकडून मोठ्या प्रमाणात रडार खरेदी सुरू करण्यात आलीय... लष्कर आणि नौदलाला देखील तय्यार राहण्याचे आदेश देण्यात आलेत. महत्वाच्या छावण्यांमधील जुने रणगाडे, तोफा आणि मशीनगन 21 मार्चपर्यंत दुरुस्त करण्यास सांगण्यात आलंय. त्यासाठी आवश्यक दारुगोळा उपलब्ध करून दिला जातो आहे.


मुल्तानमधील 1 आर्मर्ड डिव्हिजनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हालचाली पाहायला मिळतायत. रावळपिंडीमधील कोअर 12 डिवीजनमध्येही सैन्याची वर्दळ वाढलीय. पाकव्याप्त काश्मीरातील मरी भागात पाकिस्तानी सेना आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत... भारताच्या विरोधात एखादी मोठी मोहीम तर पाकिस्तान सुरू करत नाहीय ना...?