PHOTO : मंगळावरही सापडला बर्फ, हा घ्या पुरावा...
`युरोपियन स्पेस एजन्सी`नं शेअर केला फोटो
नवी दिल्ली : भारतात हुडहुडी पसरली असताना एक थंडगार बातमी आलीय. शेकडो, नव्हे हजारो नव्हे लाखों मैलांवरून. मंगळ ग्रहावर गोठलेले बर्फ सापडल्याचा दावा युरोपियन स्पेस एजन्सीनं केलाय. २००३ साली युरोपियन स्पेस एजन्सीनं सोडलेल्या 'मार्स एक्स्प्रेस'नं काही दिवसांपूर्वी काढलेला एक फोटो समाज माध्यमामध्ये एजन्सीनं शेअर केलाय. तब्बल ८२ किलोमीटरवर पसरलेले हे हिमविवर म्हणजे दुधावरची साय असल्याचा भास होतो. युरोपियन स्पेस एजन्सीनं २ जून २००३ रोजी मार्स एक्स्प्रेस नावाचं यान मंगळाकडे सोडलं. ते सहा महिन्यांनी मंगळावर पोहलचं. त्याला यंदा पंधरा वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं 'युरोपियन स्पेस एजन्सी'नं हा फोटो शेअर केलाय.
याआधीही मंगळ ग्रहावर पाणी, हवा आणि बर्फ अस्तित्वात असल्याचे संकेत मिळालेत. मंगळ ग्रह दोन गोलार्धात विभाजित झालाय. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धाची स्थिती वेगवेगळी असल्याचंही युरोपियन स्पेस एजन्सीच्या अंतराळ अभियानात सहभागी झालेल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. उत्तर गोलार्धात मजबूत जमीन दिसते तर दक्षिण गोलार्धातील काही भागांत खोल खड्डे आढळल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.