अपघातानंतरही थांबला नाही विध्वंस, विमानाला लागलेली ही आग पाहून तुमचं मन हेलावेल
रेड एअरच्या फ्लाइटमध्ये लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई : डोमिनिकन रिपब्लिकमधील सॅंटो डोमिंगो येथून येणारे रेड एअरच्या विमानाला काही तांत्रिक अडचणींमुळे आग लागली होती, ज्यामुळे हे विमान एका लहान इमारतीला आणि कम्युनिकेशन टॉवरला धडकले. या विमानात 126 प्रवासी होते. मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लोकांच्या अंगावर काटा उभा राहात आहे.
एपीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तीन प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या लागलेल्या आगीमुळे जिवीतहानी झाली नाही.
खरंतर रेड एअरच्या फ्लाइटमध्ये लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला या अपघाताचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा येईल. या व्हिडीओमध्ये आकाश काळ्या धुराने झाकलेले दिसत आहे. तर प्रवाशांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत आहे. जीव वाचवण्यासाठी सगळे तिथून पळून जात आहेत. तर ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
या अपघातामुळे प्रवाशाची चेंगराचेंगरी झाल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. विमान लॅन्डिंगनंतर सर्वच एअरपोर्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.