नवी दिल्ली : काही दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचं ग्रह बदललेत. इमरान खान कोणत्या ना कोणत्या वादात अडकताना दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, आता त्यांना चीन दौऱ्यावरूनही ट्रोल केलं जाऊ लागलंय. इमरान खान यांनी नुकताच चार दिवसांचा चीनचा दौरा केला. बीजिंगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'वेल्ट एन्ड रोड समिट' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इमरान खान चीनमध्ये दाखल झाले होते. परंतु, चीनमध्ये इमरान खान यांचं ज्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं त्यामुळे अनेकांना धक्का बसला... पाकिस्तानी नागरिकांनीही सोशल मीडियावरून व्यंगात्मक पद्धतीनं आपला राग व्यक्त केला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमासाठी चीनमध्ये दाखल झालेल्या इमरान खान यांच्या स्वागतासाठी चीनकडून कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती. चीनचा कोणताही अधिकारी किंवा नेता त्यांच्या स्वागतासाठी आला नव्हता. तर इमरान खान यांचं स्वागत बीजिंगच्या म्युनिसिपल कमेटीच्या डेप्युटी सेक्रेटरी जनरल ली लिफेंग यांनी सामोरं जात इमरान खान यांचं स्वागत केलं. 



ही गोष्ट समोर आल्यानंतर चीनला आपला 'पक्का मित्र' म्हणवणाऱ्या इमरान खान यांची त्यांच्याच देशात खिल्ली उडवली जातेय. 


पाकिस्तानी नागरिक आपला राग व्यक्त करत आहेत. ट्विटरचा एक युझर आतिफ महमूदनं लिहिलंय, 'आम्ही चीनचं स्वागत सीमेवर जेएफ १७ थंडर लढाऊ विमान पाठवून करतो आणि पाहा आपलं तिथं कसं स्वागत होतं'



 


यावर आणखी एक युझर म्हणतो, एका भिकाऱ्याचं स्वागत कसं केलं जातं, हे चीनला चांगलंच माहीत आहे... जेव्हाही पाकचे नवे पंतप्रधान चीनला जातात तेव्हा भीक मागणं सुरू करतात.



 


उल्लेखनीय म्हणजे, चीनला रवाना होण्यापूर्वी 'चीन आपला सर्वात जवळचा मित्र आणि आयर्न ब्रदर आहे. आपल्या हितांसंबंधी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मी खास मित्र राष्ट्राध्यक्ष शी आणि प्रीमियर ली यांची भेट घेण्यासाठी उत्साही आहे' असे उद्गार इमरान खान यांनी काढले होते. यापूर्वी अनेकदा पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी चीनचा उल्लेख 'खास मित्र' म्हणून केलाय.