इस्लामाबाद : भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकचे पडसाद सध्या जगभरात उमटताना दिसत आहेत. भारताने हा हल्ला करताना पाकिस्तानी नागरिकांना कोणतीही इजा होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली होती. तसेच बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदचा तळ निर्जन ठिकाणी असल्याने ही कारवाई पूर्णपणे दहशतवाद्यांविरोधात होती, असा दावा भारताने केला आहे. मात्र, पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारताने आपल्या हद्दीत घुसून नियमांचे उल्लंघन केल्याचा कांगावा सुरु केलाय. सीमारेषेपासून तब्बल ८० किलोमीटर आतमध्ये असणाऱ्या 'जैश'च्या अड्ड्यांना यावेळी भारतीय वायूदलाने उद्ध्वस्त केले. या कारवाईचे पडसाद पाकिस्तानी संसदेत मंगळवारी उमटले. संसदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहात बराचवेळ 'इम्रान खान शर्म करो, शर्म करो'चा आवाज घुमत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही भारताने सीमारेषेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पाकिस्तानला स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण हक्क असल्याची दर्पोक्तीही यावेळी कुरेशी यांनी केली. 


भारतीय वायुसेनेच्या 'मिराज २०००' या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एअर स्ट्राईक केला. यावेळी मिराज विमानांकडून तब्बल १००० किलो स्फोटके जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर डागण्यात आली. या हल्ल्यात मसूद अजहरचा मेव्हणा आणि जैश ए मोहम्मदचा टॉप लीडर मौलाना युसूफ अजहर याच्यासह १५० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.