संयुक्त राष्ट्र महासभेत 3 महिन्याच्या बाळासह सहभागी झाल्या या पंतप्रधान
जगभरातून होतंय या महिला पंतप्रधानाचं कौतूक
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला आपल्या तीन महिन्याच्या मुलीला घेऊन जाणाऱ्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अॅरडन या सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. एका देशाच्या पंतप्रधानानं आपल्या बाळाला घेऊन हजर राहणं हे महासभेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतं आहे. अॅरडन यांच्या या निर्णयाबद्दल जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या बाळाचं ओळखपत्रदेखील बनवण्यात आलं होतं.
पंतप्रधान असताना बाळाला जन्म
महासभेनंतर अॅरडन यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील बोलकी आहे. आपण पंतप्रधान असल्यामुळं आपल्या मुलीला हा बहुमान मिळाला. पण प्रत्येक मुलाला असा बहुमान मिळावा हे आपलं स्वप्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान असताना बाळाला जन्म देणाऱ्या अॅडरन या दुसऱ्या पंतप्रधान आहे. याआधी पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांनी 1990 मध्ये पंतप्रधान असताना आपल्या मुलीला जन्म दिला होता.
विमानातील प्रवाशांची मागितली माफी
जेव्हा अॅडरन भाषणासाठी उभ्या राहिल्या तेव्हा त्यांचे पती क्लार्क गेफोर्डने मुलीला सांभाळलं. जेसिंडा अॅरडनने 21 जूनला ऑकलँडमध्ये मुलीला जन्म दिला होता. 6 महिन्यांच्या मॅटरनिटी लीव्ह नंतर त्यांनी पुन्हा कामकाज हाती घेतलं होतं. सरकार आणि मुलगी दोन्ही एकत्र सांभाळण्याचा अनुभव खूपच सुखद असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. न्यूझीलंड ते न्यूयॉर्क दरम्यान प्रवास करताना त्यांच्यामुळे झालेल्या अडचणींसाठी त्यांनी विमानातील प्रवाशांची माफी मागितली होती. जेसिंडा अॅरडन यांचे पती एका टीव्ही चॅनलमध्ये काम करतात. मुलीचा सांभाळ करण्यासाठी ते पत्नीसोबत न्यूयॉर्कला आले आहेत.