नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काश्मीरच्या मुद्यावर चर्चा झाली. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांच्यात पहिल्यांदाच बातचीत झाली आहे. द्विपक्षीय संबंध आणि क्षेत्रीय संबंधांबाबत यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चर्चेत मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उचलला. सीमेपलीकडून होणारा दहशतवाद रोखला गेलाच पाहिजे, असं मोदींनी यावेळी सांगितलं. दक्षिण आशियातील काही नेत्यांची विधानं भारताविरोधात वातावरण तयार करत असल्याचं सांगत मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नाव न घेता टोला लगावला. दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणासाठी शांतता गरजेची असल्याचंही मोदी यावेळी म्हणालेत. गरीबीविरोधात लढण्यासाठी जगातील कोणत्याही देशाला सहकार्य करण्याची भारताची तयारी असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.


काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यावेळी इम्रान खान आणि ट्रम्प यांच्यात संयुक्त पत्रकार परिषद झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मदत मागितली होती, असा दावा ट्रम्प यांनी या पत्रकार परिषदेत केला.


परराष्ट्र मंत्रालयानं तत्काळ यावर स्पष्टीकरण देत, पंतप्रधान मोदींनी काश्मीर मुद्यावर कधीही ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नसल्याचं सांगितलं. यानंतर ट्रम्प यांच्यावर भारतातूनच नव्हे तर अमेरिकेतूनही टीका झाली होती.