मुंबई : टाईम मॅगझिनच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश करण्यात आला आहे. टाईम मॅगझिनने 2020 सालातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींची नावं जाहीर केले आहेत. या यादीत मोदी हे भारतातील एकमेव राजकारणी या यादीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या या यादीत मोदींसह अभिनेता आयुष्यमान खुराना आणि दिल्लीतल्या शाहीन बाग आंदोलनातील वयस्कर महिला बिल्कीसचाही समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा देखील या यादीत समावेश आहे.


याशिवाय तैवानचे अध्यक्ष त्सई इंग-वेन यांनाही स्थान मिळाले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस, जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांच्यासह जगभरातील अनेक नेते आहेत. अमेरिकन तज्ज्ञ अँटनी फॉसी यांचेही नाव या यादीत आहे. कोरोना साथीच्या वेळी त्यांचं नाव खूप चर्चेत आलं.


आयुष्मान खुराना हा एकमेव भारतीय अभिनेता आहे ज्यांे नाव जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आहे. त्याने सोशल मीडिया अकाउंटवर म्हटलं की, 'टाईम मासिकाने जाहीर केलेल्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सामील केल्याचा मला अभिमान वाटतो.' या सन्मानाबद्दल त्याच्या चाहत्यांनी देखील त्याचं अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणनेही त्याचे कौतुक केले आहे.


आयुष्मानने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात २०१२ मध्ये विकी डोनरपासून केली होती. यानंतर त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आर्टिकल १५, बाला, ड्रीम गर्ल, अंधाधुन, बधाई या सिनेमातून देखील नाव कमावलं. अंधाधुन चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.