पाकिस्तानातील विमान अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
विमानाचा अपघात निवासी भागात झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
इस्लामाबाद : शुक्रवारी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या एक प्रवासी विमानाचा जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अपघात झाला. हे विमान लाहोरहून कराची येथे जात होतं. विमान अपघातात ९८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. विमानाचा अपघात निवासी भागात झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या दूर्दैवी घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. लँडिंग होण्यापूर्वीच विमानाचा कराची विमानतळाजवळ अपघात झाला. विमान मॉडेल टाऊन या निवासी भागात कोसळल्याने मोठी खळबळ माजली
या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत मोदी म्हणाले , 'पाकिस्तानात झालेल्या विमान अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांच्या कुटूंबियांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो आणि जखमींची प्रकृती लवकरात लवकर स्थिर व्हावी अशी प्रर्थना करतो.' अशी प्रतिक्रिया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.
विमानात १०० प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. विमान अपघातानंतर चारही बाजूंनी दूरपर्यंत धूराचे लोळ पसरले आहेत. अनेक गाड्यांना आग लागली आहे. या अपघातामुळे जिवित आणि वित्त हानीदेखील मोठ्या प्रमाणात झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून मदत व बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
घरांमधून अनेक रहिवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. कराची येथील रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.