Prague Mass Shooting: चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 20 हून अधिक लोकं या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. यापैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.


गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. प्रागमधील चार्ल्स विद्यापीठाच्या आर्ट विभागात मास शूटींगची ही घटना घडली. चेक प्रजासत्ताकचे गृहमंत्री विट रकुसन यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं की, ज्याने गोळीबार केला त्याचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अन्य कोणी हल्लेखोर नसल्याची पुष्टी करण्यात आली आहे. 


या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आल्याचे प्रशासनाचं म्हणणं आहे. याशिवाय स्थानिकांना या भागात न जाण्याचे आवाहन करण्यात येतंय.


हल्ल्याचा आणि आतंकवादाचा संबंध नाही


प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, प्राग गोळीबाराच्या या घटनेचा दहशतवादाशी संबंध नाहीये. चेक रिपब्लिकच्या इतिहासातील सर्वात वाईट सामूहिक गोळीबार असल्याचं म्हटलं जातंय. 


पोलिस प्रमुख मार्टिन वोंड्रासेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांना आधीच्या दिवशी माहिती मिळाली होती की, हा व्यक्ती राजधानीच्या बाहेरील क्लाडनो प्रदेशातील त्याच्या शहरातून प्रागला जात होता. त्यानंतर काही वेळातच शूटरचे वडील मृतावस्थेत आढळले.


सीएनएनने विद्यापीठाच्या हवाल्याने म्हटलंय की, पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं. यावेळी प्रत्युत्तर म्हणून त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. या गोळीबारात त्याला काही गोळ्या लागल्या. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.