अल़्बुकर्क, अमेरिका : अमेरिकेत जन्माला आलेल्या परदेशी नागरिकांच्या मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्वाचा हक्क काढून घेण्याची तयारी ट्रम्प प्रशासनानं सुरू केलीय. अमेरिकेत सध्या मध्यावधी निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अमेरिकेचं नागरिकत्व नसलेल्यांना जर अमेरिकेत मुलं झाली, तर मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्व मिळतं. अमेरिकन संविधानाच्या या तरतुदीचं पुनरावलोकन करण्यात येईल, असं ट्रम्प यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. अनधिकृतपणे अमेरिकेत आलेल्या अनेक नागरिकांना अमेरिकेत मुलं होतात, अशा मुलांना थेट नागरिकत्व मिळणं योग्य नसल्यानं सरसकट जन्मसिद्ध नागरिकत्वावर निर्बंध घालण्याची तयारी केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या संवैधानिक अधिकारानुसार,  अमेरिकेच्या जमिनीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलाला नागरिकत्व मिळतं.  गैर-नागरिक आणि अनधिकृत प्रवाशांच्या मुलांना मिळणाऱ्या नागरिकतेच्या गॅरंटीवर फुलस्टॉप लावण्याचा हा प्रयत्न असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी 'एक्सिओस ऑन एचबीओ'मध्ये एका मुलाखतीदरम्यान म्हटलंय.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प किंवा इतर कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी याबाबतील कोणताही आदेश जारी केला तरी त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं.


डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठलीय. खुद्द ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातून टीकेचे स्वर उमटताना दिसत आहेत.