Pakistan : इम्रान खान यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला
Imran Khan Against No-confidence motion : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इस्लामाबाद : Imran Khan Against No-confidence motion : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानी संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. अध्यक्षकांनी विरोधकांचा अविश्वास ठराव फेटाळला आहे. त्यानंतर संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
दरम्यान, अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. स्पीकरच्या निर्णयाबद्दल मी प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीचे अभिनंदन करतो. अविश्वास प्रस्ताव हा आपल्याविरुद्धचा परकीय कारस्थान होता. त्यांच्यावर कोणी राज्य करायचे हे पाकिस्तानने ठरवावे, असे इम्रान खान म्हणाले.
सभापतींविरोधात अविश्वास ठराव
नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांच्या विरोधात विरोधकांनी पाकिस्तानी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला. आज दुपारी 3 वाजता पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरही मतदान होणार होते. विरोधी पक्षनेत्यांनी 200 खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
पंजाबच्या राज्यपाल पदावरून हटवले
पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावापूर्वी पंजाब प्रांताच्या राज्यपालांना पदावरून हटवण्यात आले. 'डॉन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले की, पंजाबचे राज्यपाल मोहम्मद सरवर यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
आता अच्छे दिन येतील - मरियम नवाज
अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी मरियम नवाज यांनी ट्विट केले की, इम्रान यांना संसदेद्वारे घरी पाठवले जाईल. इतिहासातील हे सर्वात वाईट सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्याचवेळी इंशाअल्लाह अच्छे दिन येतील, असे ट्विट करताना म्हटले होते. मात्र, इम्रान खान विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचीच सत्ता राहणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
इम्रान देशाला संबोधित करणार?
दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे अधिकृत चॅनल पीटीव्हीला त्यांच्या निवासस्थानी बोलावले आहे. त्यानंतर ते देशाला संबोधित करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या संसदेत कामकाज सुरू झाले त्यावेळी संसदेचे कामकाज गदारोळ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पीटीआयचे सुमारे 20 खासदार नॅशनल असेंब्लीत पोहोचले होते.
राजीनामा देण्यास नकार
इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांनी विदेशी शक्तींना जबाबदार धरले आहे. लोकांनी आपल्याविरुद्धच्या कटाचा निषेध करावा, माझ्यासाठी नाही तर स्वत:साठी आंदोलन करावे, असे इम्रान खान यांनी जनतेला सांगितले. हे निदर्शन शांततेच्या मार्गाने व्हायला हवे, असे इम्रान म्हणाले. अविश्वास प्रस्तावात विरोधक जिंकले तर अमेरिका जिंकेल, असे इम्रान खान म्हणाले.