लाहोर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. पाकचे आरोग्यमंत्री जाफर मिर्झा यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी एधी फाऊंडेशनचे प्रमुख अब्दुल सत्तार एधी यांचा मुलगा फैसलची भेट घेतली होती. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे इम्रान खान सेल्फ क्वारंटाईनमध्ये होते. यानंतर इम्रान खान यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला होता. त्यानुसार इम्रान खान यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. मात्र, ही टेस्ट नेगेटिव्ह आल्याने पाकिस्तानने सुटकेचा निश्वास टाकला आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ९७४९ लोकांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये २०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकच्या पंजाब प्रांतात कोरोनाचे ४३२८, सिंध प्रांतात ३०५३, खैबर पख्तुनवामध्ये १,३४५, बलुचिस्तानमध्ये ४९५, गिलगिट बाल्टिस्तानमध्ये २८४, इस्लामाबादमध्ये १९४ आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे ५१ रुग्ण आहेत.



पाकिस्तानमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावे, बाहेर पडू नये, असे आवाहन सरकारच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच इम्रान खान यांनी  आपल्या नागरिकांना घरातच नमाज पठण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच जर मशिदीत नमाज पठणासाठी जायचे असल्यास सरकार आणि उलेमा यांच्या ठरलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. लोकांनी जर नियमांचे पालन केले नाही तर मशिदी बंद कराव्या लागतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी नागरिकांना दिला आहे.