PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये (White House) अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण, अंतराळ, उर्जा या क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिकेच्या वाढत्या संबंधांबरोबरच इतर मुद्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली. त्याआधी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत झालं. राष्ट्राध्यक्ष जो बायडन पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध हे 21 व्या शतकातील सर्वात निर्णायक संबंधांपैकी एक असल्याचं यावेळी जो बायडेन यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीसही यावेळी उपस्थित होत्या. पीएम मोदींनी अमेरिकेच्या कॅबिनेट मंत्र्यांचीही यावेळी भेट घेतली. गेल्या पंधरा वर्षात पहिल्यांदाच एखाद्या नेत्याचा अमेरिकेत राजकीय दौरा असल्याचं जो बायडन यांनी आपल्या भाषणात सांगितलं. तर आपलं स्वागत म्हणजे 140 कोटी भारतीयांचा गौरव असल्याचं मोदींनी बोलून दाखवलं. त्यानंतर मोदी आणि बायडन यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.


व्हाईट हाऊसमध्ये मिनी इंडियाची झलक पाहिला मिळाली. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी व्हाईट हाऊसमध्ये हिंदी गाणी वाजत होती, त्याचबरोबर त्यांच्या स्वागतासाठी भारतीय वंशांची लोकंही मोठ्या प्रमाणवर हजर होते. हातात तिरंगा घेऊन व्हाईट हाऊसबाहेर जमलेल्या नागरिकांनी 'USA USA', 'भारत माता की जय' आणि 'मोदी मोदी' अशा घोषणा दिल्या. व्हाईट हाऊसचे दरवाजे इतक्या भारतींयासाठी खुले होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं पीएम मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.


आपाल्या भाषणात मोदींनी जो बायडेन यांच्या मैत्रीपूर्ण स्वागतबद्दल आभार व्यक्त केले. व्हाईट हाऊसमध्ये आजचे भव्य स्वागत हा भारताच्या 140 कोटी देशवासियांसाठी सन्मान आणि अभिमानाचा क्षण आहे,  अमेरिकेत राहणाऱ्या 4 दशलक्षाहून अधिक भारतीयांसाठी देखील एक सन्मान असल्याचं यावेळी मोदींनी सांगितलं.  अमेरिकेत असलेले भारतीय नागरिक आपल्या कर्तृत्वाने अमेरिकेत भारताची शान वाढवत आहेत. कोविड नंतरच्या काळात जागतिक व्यवस्था नवीन आकार घेत आहे. दोन्ही देशांनी जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करण्याचा संकल्प केला आहे. पीएम मोदी यांनी आपल्या भाषणाचा शेवट जय हिंद आणि गॉड ब्लेस अमेरिका असं म्हणत केला. 


गेल्या 24 तासात पीएम मोदी आणि जो बायडेन यांच्यातील ही दुसरी भेट ठरली आहे. याआधी व्हाईच हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये मोदी आणि बायडेन एकमेकांना भेटले होते.