काठमांडू : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधून रवाना होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही काठमांडूमध्ये दाखल झाले. गांधी मानसरोवर यात्रेवर निघाले आहेत. दुपारी विमानानं ते नवी दिल्लीहून काठमांडूला पोहोचले. त्यांचा आजचा मुक्काम नेपाळमध्येच असेल आणि उद्या सकाळी ते तिबेटसाठी रवाना होतील, असं वृत्त नेपाळी प्रसारमाध्यमांनी दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिलमध्ये कर्नाटकच्या प्रचारावेळी गांधी यांनी यात्रेला जाण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यानुसार आज ते रवाना झालेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं. यावेळी नेपाळ भारत मैत्री पशुपती धर्मशाला या ४०० खाटांच्या धर्मशाळेचं उद्घाटन मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या हस्ते करण्यात आलं. या इमारतीसाठी भारतानं नेपाळला १४ कोटी डॉलर्सचं अर्थसहाय्य केलंय. 


या तीन मजली इमारतीमध्ये कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था, मुदपाकखाना, भोजनकक्ष, वाचनालय, सभागृह अशा अनेक सोयीसुविधा आहेत. धर्मशाळेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं. दरम्यान, दौरा संपवून मायदेशी परतण्यापूर्वी दोन्ही पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी बिहारमधलं रक्सूल ते काठमांडू अशा रेल्वे मार्गाबाबत करार करण्यात आला.