इस्लामाबाद : पाकिस्तान तहरीक ए इंसाफचे (पीटीआय) प्रमुख इमरान खान आज पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण करणार आहेत. इस्लामाबाद स्थित राष्ट्रपती भवनात सकाळी साडे नऊ वाजता शपथ ग्रहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. इथं राष्ट्रपती ममनून हुसैन त्यांना पंतप्रधान पदाची शपथ देणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, आमंत्रितांना धाडण्यात आलेल्या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रात केलेल्या उल्लेखानुसार, कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं होईल. त्यानंतर राष्ट्रपती, आमंत्रित आणि नवनिर्वाचित पंतप्रधान आपापली जागा घेतील. राष्ट्रगीतानंतर पवित्र कुराणचं पठण होईल. त्यानंतर हुसैन शपथ देण्यासाठी सुरूवात करतील. त्यानंतर शपथपत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील. 


या शपथ सोहळ्यासाठी क्रिकेटमधून राजकारणात उतरलेले भारताचे नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तानात दाखल झालेत. इमरान खान यांच्या शपथविधीसाठी त्यांनाही आमंत्रण मिळालं होतं... आणि त्यांनी हे आमंत्रण स्वीकारून पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला होता. सिद्धू वाघा बॉर्डर नजिकहून लाहौरला दाखल झालेत. 


'मी माझ्या मित्राच्या आमंत्रणावर पाकिस्तानात आलोय. हा खूपच खास क्षण आहे... खेळाडू आणि कलाकार देशांतील दरी मिटवतात. इथं मी पाकिस्तानी लोकांसाठी प्रेमाचा संदेश घेऊन आलोय...' असं त्यांनी लाहौरमध्ये मीडियाशी बोलताना म्हटलंय. 


'हिंदुस्थान जीवे, पाकिस्तान जीवे'चा नाराही त्यांनी यावेळी लगावला. तसंच इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली पीटीआय सरकारद्वारे देशात येणाऱ्या बदलांचं स्वागतही त्यांनी केलंय.