कतारमध्ये भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना मृत्यूदंड, ठेवण्यात आलेत `हे` गंभीर आरोप
कतारमध्ये गेल्या वर्षी अटक करण्याता आलेल्या आठ नौदल अधिकाऱ्यांना तिथल्या एका कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कतारच्या या निर्णयावर केंद्र सरकारने कठोर टीका नोंदवली आहे. हे सर्व कतारमधल्या एका खासगी कंपनीत काम करत होते.
Death Penalty : भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये (Qatar) फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या एका वर्षांपासून हे अधिकारी कतारमधल्या वेगवेगळ्या तुरुंगात बंद आहेत. कतारमधल्या कोर्टाने दिलेल्या निर्णयावर केंद्र सरकारने (Indian Government) तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी कायदेशीर पर्याय तपासले जात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. या अधिकाऱ्यांवर कोणते आरोप लावण्यात आले आहेत हे कतार सरकारने सार्वजनिक केलेलं नाही. भारताच्या ज्या आठ नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यात कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेन्दु तिवारी, कमांडर सुग्राकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि सेलर रागेश यांचा समावेश आहे.
कुटुंबियांना माहिती देण्यात आली नाही
कतारच्या राज्य सुरक्षा ब्युरो ऑफ इंटेलिजन्स एजन्सीने या अधिकाऱ्यांना 30 ऑगस्ट 2022 ला अटक केली. पण एक महिला कतारमधल्या भारतीय दुतावास किंवा अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली नव्हती. 30 सप्टेंबरला या अधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबासोबत बोलण्याची काही सेकंद वेळ देण्यात आली. त्यानंतर एक महिन्यानंतर भारतीय दुतावासातील एका अधिकाऱ्याला त्यांना भेटण्याची मुभा देण्यात आली.
अधिकारी कतारमध्ये करत होते काम
भारताचे माजी नौदल अधिकारी कतारमध्ये दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टंट नावाच्या खासगी कंपनीत काम करत होते. ही कंपनी संरक्षण सेवा पुरवते. ओमान हवाई दलाचे निवृत्त स्क्वॉड्रन लीडर खामिस अल अजमी हे या कंपनीचे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे त्यांनाही या आठ भारतीयांबरोबर अटक करण्यात आली होती. पण नोव्हेंबरमध्ये त्यांची सुटका करण्यात आली. कंपनीच्या वेबासईटवर सीनिअर अधिकारी आणि त्यांच्या पदांची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. पण भारतीय अधिकाऱ्यांच्या अटकेनंतर दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टंट कंपनीची वेबसाईट बंद आहे.
दाहरा कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर पदावर असलेल्या माजी कमांडर पूर्णेन्दु तिवारी यांना 2019 मध्ये प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने गौरवण्या आलं आहे. भारत आणि कतार देशांमधील द्विपक्षीय संबंध स्थापित करण्यास मोलाची कामगिरी बजावल्यामुळे त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
त्यांच्यावर काय आहेत आरोप?
कतार सरकारने आठ भारतीयांवर लावण्यात आलेले आरोप अद्याप सार्वजनिक केलेले नाहीत. पण मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार हे भारतीय अधिकारी त्यांच्या देशाची सुरक्षेसंदर्भातील गोपनीय माहिती इस्त्रायला पुरवत होते. पण यात कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही.