इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू युवकाची वायुसेनेत पायलट म्हणून निवड करण्यात आली आहे. राहुल देव या युवकांची पाकिस्तानी वायुसेनेत जीडी (जनरल ड्यूटी) पायलट अधिकारी म्हणून भरती करण्यात आली आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये छापण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल देव सिंध प्रांतातील सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या थरपारकर येतील राहणारे आहेत. पाकिस्तानमधील थरपारकर या भागात हिंदू समुदाय मोठ्या संख्येने राहतात. विकासापासून वंचित असलेल्या या भागातील राहुल हे पाकिस्तान हवाई दलात नियुक्ती होणारे पहिले व्यक्ती आहेत.


'ऑल पाकिस्तान हिंदू पंचायत'चे सचिव रवि दवानी यांनी राहुल यांच्या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त केला आहे. अल्पसंख्याक समाजातील अनेक सदस्य नागरी सेवेसह, सेनेच्या इतर भागातही सेवा बजावत आहेत. विशेषत: देशातील अनेक मोठे डॉक्टर हिंदू समुदायाचे आहेत, असं दवानी यांनी सांगितलं.


सरकारने अल्पसंख्याकांकडे लक्ष दिले, तर येत्या काळात अशाप्रकारचे अनेक राहुल देव देशाची सेवा करण्यास तयार असतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.