चीनच्या नादी लागल्याने आज राजपक्षेंच्या लंकेला आग
लंकेत नागरिक प्रचंड संतापल्याने आंदोलन हिंसक होत चालले आहे.
कोलंबो : राजधानी कोलंबोसह संपूर्ण श्रीलंकेमध्ये सध्या भयानक चित्र आहे. अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडलेल्या लंकेमध्ये प्रचंड हिंसाचार उफाळला आहे. या हिंसेची ठिणगी पडली ती महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर. नागरिक मुलभूत सोयींसाठी टाहो फोडत असताना खुर्चिला चिकटून बसलेले महिंदा राजपक्षे यांनी अखेर सोमवारी राजीनामा दिला. त्यामुळे शांतपणे सरकारविरोधी निदर्शनं करणा-यांवर सरकारधार्जिण्या गटांनी हल्ला चढवला आणि देशभरात हिंसा पेटली. यात अनेक जण जखमी झाले.
आता देशभरात हिंसेचं वादळ थांबायला तयार नाही. देशात आंदोलनं आणि जाळपोळीला ऊत आलाय. महिंदा राजपक्षे यांची अनेक घरं पेटवण्यात आली आहेत. एवढंच नाही, तर हम्बाटोटा येथील राजपक्ष कुटुंबीयांचं जुनं घरही आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं आहे.
आंदोलक एवढ्यावरच थांबले नाहीत. महिंदा राजपक्षे यांच्या टेम्पल ट्री येथील अधिकृत निवासस्थानीही धडक दिली आणि घराचं गेट तोडून पेटवून देण्यात आलं. राजपक्षे हे कुटुंबीयांसह त्रिंकोमाली नौदल तळावर पळाल्याची अफवा उठल्यानंतर या तळालाही आंदोलकांनी वेढा दिलाय. तर राजपक्षेंच्या इतर मंत्र्याचीही घरं संतप्त आंदोलकांनी पेटवून दिली आहेत.
देशभऱात झालेल्या हिंसेत एका खासदारासह किमान 8 जण ठार झाले असून 200च्या वर नागरिक जखमी झालेत. त्यांचे बंधू आणि श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं सरकारमधून बाहेर पडावं, सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं आणि देशाला लवकरात लवकर आर्थिक संकटातून बाहेर काढावं अशा मागण्या आंदोलक करत आहेत.
मात्र राष्ट्राध्यक्ष ना आर्थिक गर्तेतून देशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत ना राजीनामा देत आहेत. त्यामुळे भारताच्या या शेजारी देशात अभूतपूर्व अराजकता माजली आहे. चीनच्या नादी लागून अनावश्यक कर्ज घेतल्याचा परिणाम श्रीलंकेला भोगावा लागतो आहे.