७२ वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या भावा-बहिणीची सोशल मीडियामुळे पुर्नभेट

रणजीत सिंह लवकरच आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आपल्या कुटुंबासहीत करतारपूरला जाणार आहेत
नवी दिल्ली : तब्बल ७२ वर्षांपूर्वी अर्थात १९४७ मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या कबायली हल्ल्यात एकमेकांपासून दुरावलेल्या भावा-बहिणीची पुन्हा एकदा भेट झालीय. या कुटुंबातले काही सदस्य भारतात राहिले होते तर अनेक सदस्य पाकिस्तानात गेले होते. एखाद्या सिनेमाची ही कथा वाटत असेल तरी ती सत्यात घडलीय. रायसिंहनगरला राहणाऱ्या काश्मीरी कुटुंबाचे वकील हरपाल सिंह सूदन, पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणारा जुबैर नावाचा तरुण आणि पुंछमध्ये राहणारी तरुणी रोमी शर्मा यांच्यामुळे ही पुर्नभेट शक्य झालीय.
या तिघांनी पुंछमध्ये राहणाऱ्या परंतु, एकमेकांपासून दुरावलेल्या नातेवाईकांची पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी सोशल मीडियावर एक ग्रुप तयार केला आहे. याद्वारेच तब्बल ७२ वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या भावा-बहिणीची पुर्नभेट शक्य झालीय.
रायसिंहनगरच्या रणजीतसिंह यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. पाकिस्तानात राहणाऱ्या बहिणीला भेटण्याची आशाही त्यांनी सोडून दिली होती... परंतु, केवळ अशक्य वाटणारी गोष्टही सत्यात उतरताना पाहून त्यांचे डोळे भरून आले. त्यांची पाकिस्तानी बहिण शकीना यांनाही आपल्या कुटुंबाला भेटून आनंद झालाय.
अशी झाली होती ताटातूट...
१९४७ साली कबायली हल्ला झाल्यानंतर काश्मीरमधल्या मुजफराबादच्या दुदरवैना गावात राहणाऱ्या लम्बरदार मतवालसिंह यांचं कुटुंब बेघर झालं होतं. हल्ल्यादरम्यान मतवालसिंह यांचे कुटुंबीयही इतरांप्रमाणेच तिथून सटकले. परंतु, या दरम्यान त्यांची अवघ्या चार वर्षांची नात त्यांच्यापासून दुरावली.
मतवालसिंह यांचं कुटुंब आता रायसिंहनगरमध्ये राहतं. तर हल्ल्यादरम्यान दूरावलेली नात भज्जो आता पाकिस्तानात राहते. त्यांचं आताचं नाव शकीना आहे. शकीना यांनी एक शेखसोबत विवाह केलाय. शकीना यांना चार मुलंदेखील आहेत.
रणजीत सिंह लवकरच आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आपल्या कुटुंबासहीत करतारपूरला जाणार आहेत. इथंच भज्जोचं कुटुंबदेखील येणार आहे. याच पवित्र धार्मिक स्थळी ७२ वर्षांपूर्वी दुरावलेल्या भावा-बहिणीची भेट होण्याची शक्यता आहे.