नवी दिल्ली : शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) महत्वाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) आज (बुधवारी) रशियाला रवाना झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यात त्यांची चीनी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचा कोणताही कार्यक्रम नाहीये. तसेच राजनाथ सिंह यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांना भेटण्यास देखील नकार दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन आणि भारत यांच्यामध्ये असलेल्या तणावादरम्यान संरक्षण मंत्री एससीओच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत भाग घेण्यासाठी मॉस्कोला रवाना झाले. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीत सैन्याचे ब्रिगेड कमांडर भारताचे प्रतिनिधित्व करतील. 


भारत-चीन यांच्यात मंगळवारीही ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा झाली. २९-३० ऑगस्ट रोजी चीनच्या सैन्याने पँगोंग लेकच्या दक्षिणेकडील प्रदेशात घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली होती. भारतीय सैन्याने या घुसखोरीला आक्रमक प्रत्युत्तर दिले होते.


लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद म्हणाले की, 'चिनी सैन्याने 29-30 ऑगस्ट रोजी रात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पूर्व लडाखच्या मुद्दय़ावर दोन्ही बाजूंनी करार करूनही चीनने घुसखोरी केली. पण भारतीय सैन्याने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.'


चीनी सैन्याने पूर्व लडाखच्या चुमर भागात देखील मंगळवारी घुसखोरीचा प्रयत्न केला. हा कट देखील भारतीय जवानांनी उधळून लावला. एप्रिल ते मे पासून भारत आणि चीन समोरासमोर आहेत. फिंगर भाग, गलवान खोरे, हॉट स्प्रिंग्स आणि कोंगरुंग नाला या भागात चिनी सैन्य सतत भारताला उकसवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय सैन्य देखील अलर्टवर आहे.