कोण आहेत `भारतीय` वंशाचे ऋषी सुनक; ब्रिटनच्या पंतप्रधानपदी येऊन करणार इंग्रजांवर राज्य?
भारताशी आहे खास नातं...
नवी दिल्ली : 2020 या वर्षात कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान डाऊनिंग स्ट्रीटमध्ये पार्टी करण्यावरून ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांच्यावर चहूबाजुंनी टीका करण्यात आली. हाउस ऑफ कॉमंस (House of Commons of the United Kingdom)मध्ये माफी मागूनही जॉनसन यांच्या अडचणी काही कमी झाल्या नाहीत.
विरोधकांकडून सातत्यानं त्यांच्या राजीनामाच्या मागणीनं जोर धरला. ज्यामुळं आता ते यी पदाचा त्याग करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जॉनसन यांचा पंतप्रधानपदावरून पायउतार होताच त्यांच्या जागी ऋषी सुनक (Rishi Sunak)ही जबाबदारी स्वीकारणार असल्याचं बोलण्यात येत आहे.
सुनक हे मुळचे भारतीय वंशाचे असल्यामुळं इथे भारतातही त्यांची बरीच चर्चा सुरु आहे.
ब्रिटीशांवर राज्य करणार भारतीय वंशाची व्यक्ती ?
ब्रिटीशांनी भारतावर राज्य केलं आणि त्यानंतर देशात काय परिस्थिती उदभवली याचा पाढा नव्यानं वाचण्याची काहीच गरज नाही.
पण, आता मात्र हा खेळ पलटला असून एक मोठी संधीच सुनक यांच्याकडे असल्याचं म्हटलं जात आहे.
ब्रिटनच्या इतिहासात असं झाल्यास एखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीनं राज्यकारभाराची परमोच्च धुरा सांभाळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
कोण आहेत ऋषी सुनक?
ऋषी सुनक हे ब्रिटनचे रहिवासी आहेत. सध्या ते ब्रिटनच्या अर्थमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. ते ब्रिटनमधील रहिवासी असले तरीही त्यांची पाळंमुळं मात्र भारताशी जोडली गेली आहेत.
सध्याच्या घडीला सुनक यांच्या कामानं अनेकजण प्रभावित असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय त्यांना पंतप्रधानपदासाठीचा प्रबळ दावेदारही मानलं जात आहे.
नारायण मूर्ती यांचे जावई...
भारतीय सॉफ्टवेयर कंपनी इंफोसिस (Infosys) चे सहसंस्थापक नारायण मूर्ती हे ऋषी सुनक यांचे सासरे आहेत. नारायण मूर्ती यांची मुलगी, अक्षता ही ऋषी यांची पत्नी आहे.
ऋषी आणि अक्षता यांना दोन मुली आहेत. 2009 मध्ये ऋषी यांचा विवाह अक्षताशी झाला होता.
ऋषी यांचे आईवडील...
ऋषी सुनक यांचे आई-वडील मुळचे पंजाबमधील रहिवासी होते. त्यांचं कुटुंब पंजाबी हिंदू धर्माचं अनुयायी आहे.
त्यांच्या वडिलांचं नाव यशवीर सुनक आणि आईचं नाव उषा सुनक. फार आधीच यशवीर आणि उषा यांच्या कुटुंबानं परदेशाची वाट धरली आणि ते तिथे स्थायिक झाले.