Urinating In The Sea: निसर्गाच्या हाकेला ओ देण्याची वेळ आली की सामान्यपणे अनेकांना कसलंही भान राहत नाही. भटकंती किंवा फिरायला गेल्यानंतर 'कधी एकदा मोकळे होतोय' अशी अवघडल्यासारखी अवस्था होऊ नये म्हणून अनेकजण शौचालय शोधण्याची तसदी न घेता एखादा कोपरा शोधून लघूशंकेचा कार्यक्रम उरकून घेतात. भारतात तर असे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. मात्र असले प्रकार केवळ भारतातच होतात असं नाही. तर परदेशातही ही मोठी समस्या आहे. यावरच उपाय म्हणून एका प्रसिद्ध शहरामध्ये समुद्रकिनाऱ्यांवर किंवा थेट समुद्रात लघुशंका करणाऱ्यांना प्रचंड आर्थिक दंड करण्याच्या तयारी केली जात आहे. असा एका नियमच तयार केला जाणार असून समुद्रामध्ये लघुशंका करणाऱ्यांकडून एका चुकीसाठी तब्बल 67 हजार रुपये आकारले जाणार आहेत. याहून मोठी बाब म्हणजे दुसऱ्यांदा अशी चूक करणाऱ्यांकडून तब्बल 1 लाख रुपये दंड आकारला जाईल असं वृत्त 'द गार्डियन' या वृत्तपत्राने दिलं आहे.


नक्की हे प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, समुद्रकिनारी किंवा समुद्रात लघुशंका करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नवीन नियम तयार करत असलेले हे शहर स्पेनमधील आहे. मार्बेला असं या शहराचं नाव असून समुद्राचं पाणी तसेच पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ ठेवण्याच्या हेतूने हे कठोर नियम तयार केले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगण्याची शिस्त लोकांना लागावी आणि पर्यटनस्थळे अस्वच्छ होऊ नयेत असा यामागील मानस आहे. स्थानिक प्रशासनाने अशाप्रकारचे नियम तयार करण्यास होकार दिला आहे. मात्र त्यासंदर्भातील कायदा करण्यासाठी सल्लामसलत करण्याची गरज आहे. दुसरीकडे असा नियम केला तरी समुद्रकिनारी कोणी लघूशंका केली यावर लक्ष कोण ठेवणार? हा नियम मोडणाऱ्यांना कोण आणि कसं शोधणार? बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यासाठी समुद्रकिनारी तैनात करण्यात आलेले लाईफगार्ड आता लघूशंका करणाऱ्यांना रंगेहाथ पकडणार की बुडणाऱ्यांचा जीव वाचवणार असे प्रश्न या नवीन नियम आणण्यासंदर्भातील शक्यता असल्याचं समजल्यानंतर लोकांना पडले आहेत.


स्थानिकांमध्ये प्रचंड संभ्रम


मात्र या नव्या नियमासंदर्भात स्पॅनिश टीव्ही वाहिनीने स्थानिकांशी संवाद साधला असता ते गोंधळलेले असल्याचं दिसून आलं आहे. केवळ स्थानिकच नाही तर समुद्रकिनारी भटकंतीला आलेल्यांना याबद्दल विचारलं असता हा फारच संभ्रमात टाकणारा नियम आहे, असं अनेकांनी म्हटलं. गर्दीच्या वेळेस या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना कसं काय शोधणार हा मोठा प्रश्नच असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे. हे नवे नियम सध्या मस्करीचा विषय ठरत आहे. तसेच समुद्रामध्ये लघुशंका केल्यानंतर नेमकी कुठे आणि कोणी लघुशंका केली हे तैनात केलेले कर्मचारी समुद्राच्या पाण्यातून कसं शोधून काढणार? असे मजेदार पण तितकेच विचित्र प्रश्नही विचारले जात आहेत. अन्य एकाने यासाठी आता समुद्रकिनाऱ्यावर पोलीस तैनात केले जाणार आहेत का? असा प्रश्न विचारला आहे.


प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण


ही बातमी समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "या नियमामध्ये समुद्रामध्ये लघूशंका करण्यासंदर्भात कसलाही उल्लेख नाही. मात्र असे प्रकार शहरातील अंतर्गत भागांमध्ये होऊ नयेत याची काळजी घेतली जाणार आहे. रस्त्यांवर कोणीही अशी कृती करु नये यासाठी हा कायदा आहे," असं म्हटलं आहे.