युक्रेनच्या खजिन्यावर रशिया, अमेरिकेचा डोळा, ज्याला मिळेल खजिना, तो होणार राजा
रशिया-युक्रेन वादाचा जो भडका उडालाय, त्याचं मूळ युक्रेनमधल्या एका खजिन्यात दडलं आहे
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन वादाचा जो भडका उडालाय, त्याचं मूळ युक्रेनमधल्या एका खजिन्यात दडलं आहे. हे हल्ले, जाळपोळ, मिसाईल्सचा मारा सुरू आहे, कारण युक्रेनच्या पोटात २१ व्या शतकातला महत्त्वाचा खजिना लपलाय.
अतिशय किमती आणि मोठ्या खनिजासाठी हे युद्ध सुरू झालं आहे. तो खजिना म्हणजे युक्रेनच्या जमिनीखालच्या असलेल्या लिथियमच्या खाणी. लिथियम हा नव्या युगाचा सगळ्यात मोठा ऊर्जेचा स्त्रोत ठरणार आहे. कारण जमाना इलेक्ट्रिक कारचा आहे आणि इलेक्ट्रिक कार्समध्ये लिथियमची बॅटरी वापरली जाते.
युक्रेनच्या खजिन्यावर रशिया, अमेरिकेचा डोळा
पूर्व यूक्रेनमध्ये तब्बल 5 लाख लीथियम ऑक्साइडचा साठा आहे. योग्य प्रकारे खोदकाम झालं तर युक्रेन जगातला लिथियमचा सर्वाधिक साठा असणारा देश ठरणार आहे . भविष्यात क्लीन एनर्जी ठरू शकणा-या लिथियम, कॉपर, कोबाल्ट आणि निकेलचे मोठे साठे युक्रेनमध्ये आहेत.
चीन आणि ऑस्ट्रेलियातील गुंतवणूकदारांची आधीपासूनच या साठ्यांवर नजर आहे . हीच संपत्ती ओळखून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की युक्रेनला स्वच्छ ऊर्जेचा साठा असलेला देश म्हणून जगात प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या प्रयत्नात होते. त्याचवेळी रशियानं युक्रेनवर हल्ला केलाय
रशिया - युक्रेन युद्धाची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशी बरीच कारणं आहेत. मात्र लिथियम हेही प्रमुख कारण आहे. कार, फोन, लॅपटॉपमध्ये लिथियमची बॅटरी वापरली जाते. पुढच्या वर्षभरात लिथियमची किंमत चौपट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्याच्या हाती लिथियम तो कुबेर होणार आहे.