नवी दिल्ली : जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. युक्रेन आणि रशिया () यांच्यातील युद्धामुळे अनेक देशांवर याचे परिणाम होणार आहेत. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. दरम्यान, अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे हे भारत सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी सरकारकडून प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे 20 हजार भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी भारत सरकार युक्रेनमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. (S Jaishankar receives phone call from Ukrainian foreign minister)


युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी परिस्थितीवर चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयशंकर यांनी ट्विट करून म्हटले की, 'युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांच्याशी फोनवर चर्चा झाली. त्यांनी सद्य परिस्थितीबद्दल माहिती शेअर केली, तसेच या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारत मुत्सद्देगिरी आणि संवादाला पाठिंबा देतो यावर मी भर दिला. परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले, 'भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांशीही चर्चा झाली आहे आणि त्यांच्या सुरक्षित परतीसाठी युक्रेनने दिलेल्या पाठिंब्याचे मी कौतुक करतो.'



हंगेरी, रोमानिया आणि पोलंडमध्ये भारतीयांना ट्रान्झिट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पश्चिम युक्रेनमधील लिव्ह आणि चेरनिव्हत्सी या शहरांमध्ये कॅम्प ऑफिस सुरू केले. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेन सरकारने आपली हवाई हद्द बंद केली आहे.


रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्याचे मान्य केले आहे. रशिया लवकरच शिष्टमंडळ पाठवून चर्चा करू शकतो. तसेच, प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आतापर्यंत एक हजाराहून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.


युक्रेनमधून भारतीयांच्या मायदेशी परतण्याच्या मुद्द्यावरून देशातील राजकारणही तीव्र झाले आहे. केंद्रातील भाजप सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढू शकले नाही, असा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला. या सरकारमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची स्थिती कमकुवत झाली आहे. दुसरीकडे, दिल्लीतील रशियन दूतावासाबाहेर निदर्शने करण्यात आली, त्यानंतर दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


भारत सरकार स्लोव्हाकिया, पोलंड, हंगेरी आणि रोमानिया मार्गे भारतीयांना परत आणत आहे. त्यासाठी भारतीय नागरिकही रस्त्याने युक्रेन-रोमानिया सीमेवर पोहोचत आहेत. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, या नागरिकांना भारतीय सरकारी अधिकारी बुखारेस्टला घेऊन जातील जेणेकरून त्यांना एअर इंडियाच्या फ्लाइटद्वारे घरी आणता येईल.