Russia Ukraine War: अन्न संपलं, पाण्याचा तुटवडा, एटीएममध्ये पैसे नाहीत, भारतीयांनी सांगितली आपबिती
युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे
Russia Ukraine War: युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. रशिया युक्रेनमधील शहरांवर सातत्याने हल्ले करत आहे. बॉम्बस्फोटाने युक्रेनचे अनेक भाग हादरले आहेत. इथली परिस्थिती इतकी भयावह आहे की युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
युद्धाच्या भीतीने मायदेशी परतू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अन्नासाठी भांडणं होत आहेत, पाण्याचा तुटवडा जाणवत आहे, तर एटीएममधले पैसेही संपले आहेत. यावरुन युक्रेनमधल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.
भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये उच्च शिक्षणासाठी जातात. पण आता अनेक विद्यार्थी युक्रेनमध्येच अडकले आहेत. दहशतीत जीवन जगणाऱ्या या विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासात जाऊन व्हिडिओ शेअर करत सुखरुप मायदेशी नेण्याची विनंती भारत सरकारकडे केली आहे. युक्रेनचा व्हिडिओ शेअर करणारा रशीद रिजवान अली या विद्यार्थ्याने सांगितलं की, इथे सगळीकडे बॉम्बस्फोट होत आहेत. आम्ही दहशतीत आहोत आणि त्यामुळे भारतात आमचं कुटुंबीय काळजीत आहे.
युक्रेनच्या ओडेशामध्ये अडकलेल्या उज्ज्वल कुमार या आणखी एका विद्यार्थ्याने तिथल्या भीषण परिस्थितीबद्दल सांगितलं आहे. रोजच्या वस्तू मिळवतानाही आता मारामारी करावी लागत आहे. इव्हानो फ्रँकिश नॅशनल मेडिकल कॉलेजमधील भारतीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दिव्यांशु गेहलोत सांगतो की, इथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दर 15 मिनिटांनी कोणत्या ना कोणत्या शहरात बॉम्बचा स्फोट होत आहे. आम्ही भारतीय दूतावास आणि भारत सरकारला हात जोडून विनंती करतो की आम्हाला येथून नेण्यात यावं.
युक्रेनच्या टेरनोपिल शहरात राहणाऱ्या रितिका निगमने सांगितले की, सकाळी उठल्यानंतर आम्ही सर्वात आधी पाणी गोळा केलं त्यानतंर अन्नपदार्थही गोळा केले. आम्ही आठवडाभर सामान आणायचो, पण आता इथे काहीच नाही. पीठ, तांदूळ, तेलही संपलं आहे. एटीएम आणि बँकांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. युक्रेनचे रहिवासी पोलंडला जात आहेत, पण आम्ही कसे जाऊ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.