`ऐन धुलाईच्या वेळी गायब होणारे मित्र गल्लीतच नाही तर NATO मध्येही असतात`
मदत लागली तर सांग असं म्हणून ऐन गरजेच्या वेळी लपून बसणारे मित्र फक्त गल्लीत नाहीत तर नाटोमध्येही असतात. असं एक मीम सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. एका अर्थी तसं पाहायला गेलं तर हे मीम खरं देखील ठरलं आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेन एकटा लढत आहे. त्याच्या मदतीला कोणीच आलं नाही.
किव्ह : मदत लागली तर सांग असं म्हणून ऐन गरजेच्या वेळी लपून बसणारे मित्र फक्त गल्लीत नाहीत तर नाटोमध्येही असतात. असं एक मीम सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. एका अर्थी तसं पाहायला गेलं तर हे मीम खरं देखील ठरलं आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेन एकटा लढत आहे. त्याच्या मदतीला कोणीच आलं नाही.
रशियाने हल्ला केल्यावर युक्रेन अजूनही एकटाच हल्ल्यांना तोंड देत आहे. अद्याप नाटो युक्रेनच्या मदतीला आलेली नाही. त्यामुळे युक्रेन एकटा पडलाय का? नाटो आणि अमेरिकेनं युक्रेनचा विश्वासघात केला का? असे अनेक सवाल यानिमित्तानं उपस्थित होत आहे.
रशियन आक्रमणाचा सामना करण्यासाठी युक्रेनला वा-यावर सोडल्याची टीका युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केली. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी शेकडो युक्रेनियन नागरिकांचा बळी गेला. मात्र नाटो आणि अमेरिका यांनी युक्रेनच्या बाजूने रशियाला प्रत्युत्तर दिलेलं नाही.
तसंच आपल्या फौजा युक्रेनच्या मदतीला युरोपमध्ये उतरणार नसल्याचंही अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे.
अमेरिकन लष्कर रशियाविरोधात युद्धात उतरणार नाहीत. युक्रेनच्या संरक्षणार्थ आमच्या फौजा युक्रेनमध्ये जाणार नाहीत असं बायडन यांनी म्हटलं आहे. अमेरिकन अध्यक्षांच्या या विधानांनंतर युक्रेनच्या अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत या युद्धात एकटे पडल्याचे उद्गार काढले आहेत.
आमच्या देशाचं रक्षण करण्यासाठी आम्हाला एकाकी सोडलंय. आमच्या बाजूने कोण लढणार? मला तरी कोणी दिसत नाही. नाटोचं सदस्यत्व आम्हाला मिळेल याची शाश्वती आता आम्हाला कोण देणार? सगळेच घाबरलेत असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
नाटोचं सदस्यत्व देतो, रशियाने युद्धखोरी केली तर आम्ही आहोतच पाहून घ्यायला अशी मोठमोठी आश्वासनं आधी नाटो आणि अमेरिकेनी दिली होती. मात्र आता रशियानं थेट हल्ला केल्यानंतर मात्र अमेरिका आणि नाटोच्या फौजा केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत.
झेलेन्स्की हे रशियाचे टार्गेट नंबर वन आहेत. तरीही त्यांनी अजून देश सोडलेला नाहीच पण आपल्या जवानांसोबत ते युद्धभूमीवर उतरले आहेत. या युद्धात रशियाच्या तोंडी दुबळ्या युक्रेनला दिल्याचं चित्र जग पाहत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी कोणाचा नसतो हेच यातून सिद्ध झालं आहे.