Russia-Ukraine War : रशियाने फेसबुकवर घातली बंदी, फेसबूकच्या कारवाईनंतर मोठे पाऊल
युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरु आहेत. पण लवकरच दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
मॉस्को : युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाने मोठे पाऊल उचलले आहे. रशियाने फेसबुकवर अंशत: बंदी घातली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने क्रेमलिन समर्थित मीडियावर बंदी घातली होती. या कारवाईला उत्तर म्हणून रशियाकडून हे पाऊल उचललं गेल्याचं मानले जात आहे.
युक्रेनने शांततेसाठी आवाहन केलं असून ते रशियासोबत चर्चेला तयार असल्याचं म्हटलं आहे. यावर रशियाने मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, आम्ही युक्रेनवर कब्जा करणार नाही, मात्र रशिया युक्रेनला कोणत्याही किंमतीवर अण्वस्त्रे बनवू देणार नाही.'
रशियाने आपल्या हल्ल्याने युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे. रशियन हल्ल्यात अनेक सैनिकांना जीव गमवावा लागला आहे, तर युक्रेनची अनेक शहरे रशियाच्या ताब्यात गेली आहेत. आता युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चा होऊ शकते असे दिसते. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शुक्रवारी मोठे वक्तव्य केले असून युक्रेनच्या लष्कराने युद्ध थांबवल्यास रशिया चर्चेसाठी तयार आहे. दरम्यान, भारतातील रशियन दूतावासाने अशी माहिती दिली आहे की, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनशी चर्चा करण्यास तयार आहेत आणि त्यासाठी ते एक शिष्टमंडळ पाठवणार आहेत.