Wagner Rebellion Vladimir Putin Address Nation: रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धाची (Russia Ukraine War) झळ आता रशियामधील सत्ताधाऱ्यांनाच बसताना दिसत आहे. युक्रेनमध्ये हल्ला करणाऱ्या 'वॅगनर ग्रुप'च्या (Wagner Group) तुकडीने बंडखोरी करत आता मॉस्कोच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याने मॉस्कोला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. 'वॅगनर ग्रुप'चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांच्या नेतृत्वाखाली ही बंडखोरी झाल्यानंतर रशीयातील काही शहरं आणि लष्करी तळ या गटाने ताब्यात घेतलेत. त्यामुळेच मॉस्कोमध्ये येणारे जाणारे सर्व रस्ते रशियन सरकारने बंद केले आहेत. अशातच आता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशाला संबोधित केलं आहे.


रशियाचं भविष्य काय असेल हे ठरेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बंडखोरीवर पहिली प्रतिक्रिया पुतिन यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून नोंदवली आहे. "रशिया आपल्या भविष्यासाठी कठोर संघर्ष करत आहे. त्यामुळेच आपण त्या सर्व गोष्टी सोडून देणं गरजेचं आहे ज्या आपल्याला कमकुवत बनवत आहेत," असं आवाहन रशियन राष्ट्राध्यक्षांनी केलं आहे. रशियाचं भविष्य काय असेल हे सध्या सुरु असलेल्या संघर्षामधून स्पष्ट होणार आहे. सध्या एक राष्ट्र म्हणून आपण आपले मतभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे, असंही पुतिन यांनी पत्रकाद्वारे जारी केलेल्या आपल्या संबोधनात म्हटलं आहे.


अंतर्गत विश्वासघात


आज आपण ज्या गोष्टींचा सामना करत आहोत हा अंतर्गत विश्वासघात केल्याचा प्रकार आहे. आपल्याला देशातील सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता आहे. जो कोणी बंडखोरांच्या बाजूने जाईल त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. बंडखोरांना साथ देणाऱ्यांना कायद्याला आणि रशियन लोकांना स्पष्टीकरण द्यावं लागेल, असं पुतिन यांनी म्हटलं आहे.


आम्ही सडेतोड उत्तर देणार


सध्या देशात जे काही सुरु आहे हे आपल्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं आहे. याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे. आम्ही आमच्या लोकांच्या प्राणांसाठी आणि सुरक्षेसाठी लढत आहोत. त्यामुळेच मतभेद विसरुन आपण एकत्र येण्याची गरज आहे. या शसस्त्र बंडखोरीला आम्ही सडेतोड उत्तर देणार आहोत, असं पुतिन यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे. खासगी हितांसाठी देशाबरोबर विश्वासघात झाला आहे. मात्र आम्ही आमच्या नागरिकांचं संरक्षण करणार, असं पुतिन यांनी स्पष्ट केलं आहे.


मॉस्को लष्करी छावणी


दरम्यान, या बंडखोरीनंतर पुतिन यांना रशियाचं सत्ता केंद्र असलेल्या क्रेमलिन म्हणजेच रशियन सरकारकडून घडामोडींबद्दल माहिती दिली जात आहे. यामध्ये संरक्षण मंत्रालय, अंतर्गत संरक्षण खातं, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड गटांकडून पुतिन यांना माहिती पुरवली जात आहे. रशियन संसदेची इमारत ड्यूमाचं संरक्षण वाढवण्यात आलं आहे. तसेच पुतिन हे प्रत्यक्षात टीव्हीवरुन जनतेला संबोधित करतील असंही सांगितलं जात आहे. मॉस्कोच्या संरक्षणासाठी रशियन लष्कराने चारही बाजूंनी शहराला वेढा घातला आहे.


काही शहरांमधील लष्करी तळ 'वॅगनर'च्या ताब्यात


मॉस्कोच्या दिशेने 'वॅगनर ग्रुप' वाटचाल करत असल्याने राजधानीच्या शहरात दहशतवादविरोधी मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. 'वॅगनर ग्रुप'ला तोंड देण्यासाठी रशियन संरक्षण मंत्रालय, रशियन लष्कराची चर्चा सुरु आहे. दरम्यान रोस्तोव शहरामधील लष्करी केंद्र 'वॅगनर ग्रुप'ने ताब्यात घेतलं आहे.