अमेरिकन पत्रकाराची आमच्या अधिकाऱ्यांकडून हत्या, सौदीनं केलं मान्य
वाढत्या दबावानंतर सौदी अरबनं दोन अधिकाऱ्यांना बरखास्त केलंय
रियाध : सौदी अरबनं दोन आठवड्यांहून जास्त काळानंतर शनिवारी अमेरिकन पत्रकार जमाल खगोशी यांची हत्या झाल्याचं मान्य केलंय. इस्तंबूल स्थित वाणिज्य दूतावासात जमाल यांची सौदी अधिकाऱ्यांनी हत्या केलीय. खगोशी यांचं अचानक बेपत्ता झाल्यानंतर सौदीवर आंतरराष्ट्रीय संकट ओढावलं होतं.
वाढत्या दबावानंतर सौदी अरबनं दोन अधिकाऱ्यांना बरखास्त केलंय. हे दोघं राजकुमार मोहम्मद बिन सलमानचे मुख्य सहाय्यक होते.
खगोशी गायब झाल्यानंतर सौदी अरब त्यांच्या हत्येच्या बातम्यांवर नकार देत होतं.. यानंतर पत्रकाराची हत्या झालीय हे सिद्ध झलां तर सौदीवर बंदी आणू, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती.
यानंतर सौदी अरबनं आता, खगोशी यांची हत्या आपल्या अधिकाऱ्यांकडून झाल्याचं कबूल केलंय. दूतावासात चर्चेचं वादात रुपांतर झाल्यानंतर खगोशी यांची हत्या झाल्याचं सौदीचे अॅटॉर्नी जनरल शेख साद-अल-मोजेब यांनी म्हटलंय.
पत्रकार जमाल खगोशी यांचं शव कुठेय? याची मात्र त्यांनी माहिती दिली नाही. तुर्की अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आपल्या चौकशीचा घेरा वाढवत इस्तंबूल शहरात एक शोध मोहीम हाती घेतल्यानंतर सौदीनं या हत्येची कबुली दिलीय.