Shanghai Cooperation Organization: भारताने आगामी परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी पाकिस्तान आणि चीनसह शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) सर्व सदस्यांना औपचारिकपणे निमंत्रण पाठवली आहेत. 4-5 मे रोजी गोव्यात (Goa) बैठक होणार आहे. निमंत्रित पाहुण्यांमध्ये चीनचे नवे परराष्ट्र मंत्री किन गँग आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये भारताने SCO Meet चे अध्यक्षपद स्वीकारले होते. या वर्षी भारतामध्ये SCO Meet ची बैठक आणि शिखर परिषदा होणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल या बैठकीला उपस्थित राहणार की नाही याबद्दल पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.


मुंबईत होणाऱ्या SCO चित्रपट महोत्सवात पाकिस्तान सहभागी होणार नाही. सर्व देशांनी प्रवेशिका पाठवल्या असताना, पाकिस्तान हा एकमेव देश आहे ज्याने या गटाच्या तिसऱ्या अशा फिल्म महोत्सवासाठी कोणताही सिनेमा पाठवलेला नाही. माहिती आणि प्रसारण विभागाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर यांनी सोमवारी सांगितले की, "एकच SCO सदस्य देश आहे त्यांच्याकडून प्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.


20 वर्षे जुन्या संघटनेचे सदस्य रशिया, भारत, चीन, पाकिस्तान आणि चार मध्य आशियाई देश - कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे आहेत. इराण हा सदस्य बनणारा नवीन देश आहे आणि भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच पूर्ण सदस्य म्हणून गटाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. शांघाय सहकार्य संघटनेची शेवटची बैठक उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झाली होती.


भारत-पाक संबंध तणावपूर्ण  


दरम्यान, भारत-पाकिस्तान संबंधांचा इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. दोन्ही देशांत तणाव कायम आहे.  पाकिस्तान आपल्या भूमीतून भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादी कारवायांना करत आला आहे. याला भारताकडून विरोध होत आहे. त्याचवेळी इस्लामाबाद कोणत्याही चर्चेसाठी जम्मू-काश्मीरसाठी कलम 370 बहाल करण्याची मागणी करत आहे.


बिलावलची पीएम मोदींवर वादग्रस्त टीका


 बिलावल भुट्टो झरदारी यांनी गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांमध्ये (यूएन) पीएम मोदींवर केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. दरम्यान, जरी पाकचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी त्यांच्या एका मुलाखतीत भविष्यात पाकिस्तानची वृत्ती नरमण्याची असेल, असे संकेत दिले होते. तरी वादग्रस्त वक्तव्याचा तणावात भर पडली आहे.


अल अरेबिया या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरीफ म्हणाले, 'आपण शांततेत आणि प्रगतीमध्ये राहायचे की आपापसात भांडायचे आणि वेळ आणि संसाधने वाया घालवायची हे आपल्यावर अवलंबून आहे. भारतासोबत आपली तीन युद्धे झाली आहेत आणि त्यामुळे लोकांवर आणखी दुःख, गरिबी आणि बेरोजगारी आली आहे. आम्हाला शांततेत जगायचे आहे.