लंडन : कोरोनानंतर आता दुसरे संकट आले आहे. हे संकट इबोलाच्या माध्यमातून आले आहे. आफ्रिकेत इबोला विषाणूने डोके वर काढले आहे. काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात इबोलाचा दुसरा प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी झाली आहे.जागतिक आरोग्य संघटनेने ( World Health Organization) इबोलाचा उद्रेक झाल्याचे जाहीर केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँगोमध्ये कोरोना संसर्गामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. येथे संसर्गाची ३००० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर ७१  लोकांचा मृत्यूही झाला आहे.  डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, काँगो आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये चाचणी किट आणि इतर आरोग्य सुविधांचा अभाव आहे. अशा परिस्थितीत संक्रमणाच्या बाबतीत अचानक वाढ होण्याची नोंद येथे नोंदविली जाऊ शकते. काँगोमध्ये खरसाचा प्रादुर्भाव देखील आहे. जानेवारी २०१९पासून तीन लाख पन्नास हजार लोक खरसाने प्रभावित झाले आहेत, तर ६५ हजारहून अधिक लोक मरण पावले आहेत. 


दरम्यान, आफ्रिकेतील काँगो देशात‘इबोलाचे सहा रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतची माहिती दिली आहे. एप्रिलमध्ये बेनी शहरात इबोलाच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता इबोला पश्चिम शहरातल्या माबंडाकापर्यंतही पसरला आहे. दोन शहरांमध्ये सुमारे ६२० मैलांचे अंतर आहे. काँगोमधील इबोलाचा हा अकरावा उद्रेक आहे. 



 काँगोचे आरोग्यमंत्री इतेनी लाँगोंडो यांनी सांगितले, माबाडाकामध्ये इबोलाची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आम्ही तेथे लवकरच लस आणि औषधे पाठवणार आहोत. काँगोच्या इक्वेतेर प्रांतात २०१८ मध्ये इबोलाचा उद्रेक झाला आणि ५४ घटना नोंदल्या गेल्या. त्यामधील ३३ लोकांचा मृत्यू झाला. काँगोमध्ये दोन नवीन लस वापरल्यानंतरही आतापर्यंत २२६० लोकांचा इबोला विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.